पंढरपूर – कार्तिकी यात्रा कालावधीत श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी राज्यातील विविध जिल्ह्यातून तसेच परराज्यातून मोठ्या प्रमाणात भाविक येतात. कार्तिकी शुध्द एकादशी रविवार दि. २ नोव्हेंबर, २०२५ रोजी असून, यात्रा कालावधीत पासष्ठ एकर (भक्ती सागर) येथे मोठ्या प्रमाणावर दिंड्या तसेच वारकरी भाविक मुक्कामी असतात. या ठिकाणी प्रशासनाकडून उपलब्ध करण्यात येणाऱ्या सुविधाची पाहणी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली.
यावेळी त्यांच्या समवेत आमदार सिद्धाराम म्हेत्रे ,अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी, अप्पर उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत डगळे, प्रांताधिकारी सचिन इथापे, कार्यकारी अभियंता अमित निमकर, तहसीलदार सचिन लंगुटे, मुख्याधिकारी महेश रोकडे, संबधित विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.
याप्रसंगी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पासष्ठ एकर (भक्ती सागर) येथे भाविकांना स्वच्छ पिण्याचे पाणी, स्वच्छता, सुरक्षित विद्युत व्यवस्था, सुलभ शौचालय, प्रखर प्रकाश व्यवस्था, आरोग्य सुविधा उपलब्धते बाबत माहिती घेतली. तसेच आवश्यक ठिकाणी मुरमीकरण, रस्ते दुरुस्ती तात्काळ करावी अशा सुचना त्यांनी यावेळी दिल्या.
 
	    	 
                                




















 
                