देगलूर – महाराष्ट्र–तेलंगणा–कर्नाटक या तीन राज्यांच्या त्रिसीमेवर वसलेले देगलूर शहर म्हणजे जणू ‘मिनी इंडिया’च जणू दर्शन होय. विविध भाषा, संस्कृती आणि परंपरांचा संगम असलेल्या या शहरातील देगलूर महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाने यंदा बहुभाषिकतेचा आगळा-वेगळा ठसा उमटवला आहे. शहरातील सर्वात जुने महाविद्यालय म्हणून ओळख असलेल्या अडत व्यापारी शिक्षण संस्थेच्या रंगमंचावर यावेळी केवळ कार्यक्रम नव्हे, तर संस्कृतींचा संवाद घडून आला आहे.
या स्नेहसंमेलनात मराठी, तेलुगु, कन्नड, हिंदी, उर्दू, दख्खनी, इंग्रजी, बांग्ला, गुजराती, बंजारा, राजस्थानी, संस्कृत, हैदराबादी अशा अनेक भाषांतून गीतगायन, नृत्य, भाषण आणि नाट्यप्रयोग सादर करण्यात आले. महाविद्यालयाच्या स्नेहसंमेलनात इतक्या भाषांचा सुरेल संगम क्वचितच पाहायला मिळतो. विशेष म्हणजे मुंबई-पुण्यासारख्या महानगरांतही जिथे बहुभाषिक कार्यक्रम दुर्मिळ ठरतात, तिथे देगलूरसारख्या सीमावर्ती शहरात हा सांस्कृतिक मेळा साकारला गेला आहे. प्रत्येक सादरीकरणात त्या-त्या भाषेची अस्मिता, लोकपरंपरा आणि भावविश्व जपले गेले. कधी बंजारा नृत्यातील ठेका रंगमंच हलवून गेला, तर कधी संस्कृत श्लोकांच्या उच्चारांनी वातावरण भारावून टाकले. उर्दू-दख्खनीच्या अदबी शब्दसौंदर्याला हिंदी-मराठी गीतांनी सुरेल साथ दिली. हिंदी, इंग्रजी व रिमीक्स गाण्यांच्या सादरीकरणांनी आधुनिकतेची झलक दाखवली, तर राजस्थानी, गुजराती, बांग्ला, मराठमोळी लावणी लोकनृत्यांनी परंपरेची मुळे अधोरेखित केली.
या स्नेहसंमेलनातून विद्यार्थ्यांनी केवळ कलागुणांचा आविष्काराचे केवळ सादरीकरण केला नाही, तर “भाषा वेगळी, संस्कृती वेगळी; तरीही मन एकच” हा संदेश ठळकपणे दिला. देगलूरच्या बहुभाषिक-बहुसांस्कृतिक वारशाचे जतन व संवर्धन करण्याची जबाबदारी नव्या पिढीने आनंदाने स्वीकारल्याचे या कार्यक्रमातून स्पष्ट झाले. देशभरात सांस्कृतिक एकात्मतेच्या चर्चा सुरू असताना, देगलूर महाविद्यालयाच्या स्नेहसंमेलनाने प्रत्यक्ष कृतीतून एकोप्याचा आदर्श घालून दिला. सीमारेषा जिथे संपतात, तिथे संस्कृतींचा संगम सुरू होतो. हेच देगलूर येथील देगलूर महाविद्यालयाच्या स्नेहसंमेलनातून पुन्हा एकदा सिद्ध झाले.

























