वेळापूर – महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांचे आज सकाळी सुमारे ९:१५ वाजता बारामतीकडे येत असताना विमान लँडिंगदरम्यान झालेल्या अपघातात दुःखद निधन झाल्याची वार्ता समोर आली. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली असून नागरिकांच्या मनात तीव्र दुःख व्यक्त होत आहे.
ही बातमी वेळापूर नगरीत पसरताच, व्यापारी व नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने सर्व दुकाने व व्यवसाय बंद ठेवून आपल्या भावना व्यक्त केल्या. वेळापूर ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामस्थांच्या वतीने उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी वेळापूर ग्रामपंचायतीचे सरपंच रजनीश बनसोडे यांनी, “महाराष्ट्राने एक अनुभवी व प्रभावी नेतृत्व गमावले आहे. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना,” असे भावनिक शब्दांत श्रद्धांजली व्यक्त केली.
या श्रद्धांजली कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्य, व्यापारी बांधव, विविध संघटनांचे पदाधिकारी तसेच अमोल मंडलिक, रणजीत सरवदे, प्रदीप सरवदे, दिलीप जगदाळे, दीपक माने, धनाजी धांडोरे, अवी मुंगूसकर, दीपक जाधव, सुभाष माने, सुरेश जाधव, मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. संपूर्ण वेळापूरमध्ये शोकमय वातावरण असून नागरिकांनी शांततेत व संयमाने आपली आदरांजली व्यक्त केली.


















