माहूर – ‘मनात भगवंताची प्रतिमा तयार करणे आणि त्या रुपाशी समरस होऊन दोषमुक्त होणे!’ या उद्देशाने माहूरच्या दत्तगड परिसरातील अमृतकुंड येथे दत्तभक्तांच्या उपस्थितीत दिनांक २० ते २२ जानेवारी २०२६ दरम्यान आयोजित करण्यात आलेला तीन दिवसीय नामस्मरण सोहळा मोठ्या भक्तिमय वातावरणात व उत्साहात संपन्न झाला.
या तीन दिवसीय कार्यक्रमाची सुरुवात दररोज सकाळी ६ ते ९ या वेळेत नामस्मरणाने करण्यात येत होती. त्यानंतर ९ ते १० या वेळेत दत्तनामावर आधारित प्रवचन, तर सकाळी १० नंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. दुपारी ३ ते ५ या वेळेत दत्तप्रभूच्या नामाची पोथी वाचन, तसेच सायंकाळी ६ ते ९ या वेळेत पुन्हा नामस्मरण आणि रात्री ९ वाजता कीर्तन असे भक्तिमय कार्यक्रम पार पडले.
ईश्वराचे, सद्गुरूंचे किंवा मंत्राचे नाम सतत मनात किंवा वाणीने उच्चारणे म्हणजेच नामस्मरण भक्ती होय. हा सोहळा मनाला शांती, भक्ती आणि एकाग्रता मिळवून देणारा आहे. कलियुगात भगवंताचे नाव घेणे हाच उद्धाराचा सर्वात सोपा मार्ग मानला जातो, ज्यामुळे मनातील दु:खाचा दगड वितळून जातो, असा विश्वास भक्तांमध्ये मानला जातो.
यामुळे मनाची एकाग्रता वाढते, ताणतणाव कमी होतो, आणि मनाला शांती मिळते. हे मोक्षाचे साधन मानले जाते. याच उद्देशाने अमृतकुंड येथे आयोजित या तीन दिवसीय नामस्मरण सोहळ्यामध्ये
अनेक भक्तांनी एकत्र येऊन ईश्वराचा नामजागर केला.
या तीन दिवसीय धार्मिक कार्यक्रमासोबतच विविध सामाजिक उपक्रमांचाही समावेश करण्यात आला होता. यामध्ये वनराई बंधारे उभारणी, वृक्षारोपण, तसेच अमृतकुंड परिसराची स्वच्छता करण्यात आली.
धार्मिकतेसोबतच पर्यावरण व सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेशही या उपक्रमांतून देण्यात आला.
कार्यक्रमाची सांगता पुरणपोळी व आंब्याच्या रसाच्या महाप्रसादाने करण्यात आली.
अमृतकुंड हे दत्त महाराजांचे चरणस्पर्श झालेलं पवित्र कुंड असून येथे साधना केल्यास विशेष आध्यात्मिक अनुभूती मिळते, असे मानले जाते. “राहायचं असेल तर यक्ष-निशब्द बिंदू साक्ष ठेवून, ओम बिंदूवर लक्ष केंद्रित केल्यासच दत्तानंद प्राप्त होतो,” असा संदेश यावेळी देण्यात आला.
कीर्तनातून राष्ट्रसंत साईनाथ महाराजांनी आपले विचार मांडताना, “भक्ती निष्काम असावी. मागणे एकच असावे—‘तुझा विसर कधीही पडू नये’,” असा भावनिक संदेश भाविकांना दिला.
या कार्यक्रमाचे आयोजन जवाहरलाल जैस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. कार्यक्रमास आयोजकांच्या पत्नी सौ. कांचन जवाहरलाल जैस्वाल, भाऊ पाटील, संभाजीनगर विभाग संघचालक बबनराव जमाडे, महागाव नगराध्यक्ष दिलीपराव कोपरकर, तंटामुक्त समिती अध्यक्ष निळू पाटील, नथ्थूपाटील करंजखेड यांच्यासह परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.























