सोलापूर – विहीरीवरील मोटार व केबल चोरी प्रकरणी दोन आरोपींना अटक करत ८९ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
आरोपी विशाल श्याम जाधव (रा. साठे नगर, धाराशिव) याला ताब्यात घेण्यात आले. चौकशी दरम्यान त्याने शेतक-यांच्या विहिरीवरील इलेक्ट्रॉनिक पाण्याच्या मोटारी व केबल चोरी केल्याची कबुली दिली व चोरी केलेला मुद्देमाल काढून दिला.
या गुन्ह्याचा पुढील तपास करत असताना आरोपीचा साथीदार समीर अल्ताफ सय्यद (रा. समर्थ नगर, धाराशिव) याला ताब्यात घेऊन अधिक चौकशी करण्यात आली. त्यावेळी त्याने वैराग पोलीस ठाणे हद्दीतील विहीरीवरील पाण्याच्या मोटारी व केबल चोरी केल्याची कबुली दिली. आरोपींकडून ६ इलेक्ट्रॉनिक पाण्याच्या मोटारी व सुमारे ४०० केबल असा एकूण ८९,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे परिसरातील शेतकरी वर्गात समाधान व्यक्त करण्यात येत असून अशा प्रकारच्या चोरीच्या घटनांवर आळा बसण्यास मदत होणार आहे.
सदरची कारवाई अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण, प्रितम यावलकर, अपर पोलीस अधीक्षक, अशोक सायकर, उपविभागीय पोलीस अधिकारी, बार्शी विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक प्रतापसिंह जाधव, पोलीस हवालदार भोरे, पोलीस कॉन्स्टेबल आकाश पवार व राहुल पाटील यांनी केली आहे.


























