म्म्ममाहूर – तहसीलदार हा तालुका स्तरावरील प्रशासनाचा कणा मानला जातो, ज्यावर कायदे आणि सुव्यवस्था राखण्याची मोठी जबाबदारी असते. आणि ही जबाबदारी माहूरचे तहसीलदार अभिजित जगताप हे चोखपणे पार पाडत असल्याचे नुकताच त्यांनी घेतलेल्या एका लोकहितवादी निर्णयावरुन स्पष्टपणे दिसून येते. आणि ते म्हणजे,तहसील कार्यालय व परिसरात कोणत्याही प्रकारचे अनाधिकृत दलाल/एजंट यांना प्रवेश व काम करण्यास सक्त मनाई असल्याचा सूचना फलक लावून प्रतिबंध केला आहे. तसेच दलाली करताना कोणी आढळून आल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल,असा सूचनावजा कडक इशाराही सूचना फलकावर लिहिला आहे.
तहसीलदार कार्यालयात किंवा प्रशासकीय इमारतीत अनधिकृत मध्यस्थ (दलाल) पैसे घेऊन सामान्य नागरिकांची कामे करून घेतात, त्यांना रोखणे म्हणजे पारदर्शक कारभार करणे होय. यामुळे लाचखोरीला आळा बसतो, कामात गतिमानता येते, थेट नागरिकांचा अधिकाऱ्यांशी संवाद वाढतो आणि शासकीय कामांत पारदर्शकता व विश्वासार्हता निर्माण होते.
याच जाणिवेतून आणि जबाबदारीतून
माहूरचे तहसीलदार
अभिजित जगताप यांनी
तहसील कार्यालय व परिसरात नागरिकांची फसवणूक होऊ नये तसेच शासकीय कामकाजात पारदर्शकता राखण्यासाठी खासगी दलाल व एजंट यांना प्रतिबंध करण्याचा निर्णय घेतला आहे.तहसील कार्यालयातील सर्व शासकीय कामकाज हे संबंधित शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्यामार्फत थेट केले जाते. कोणत्याही प्रकारचे काम करून देण्याचे आमिष दाखवणारे दलाल, एजंट किंवा मध्यस्थ यांना कार्यालयीन परिसरात फिरण्यास मज्जाव करण्यात आला आहे. अशा व्यक्ती आढळून आल्यास त्यांच्यावर नियमानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.महत्वाचे म्हणजे सदरील सूचना फलकावर तहसील कार्यालय स्तरावर मदत केंद्राची स्थापना केली असल्याचेही ठळकपणे अधोरेखित केले आहे. ज्याचा अधिकृत क्रमांक 02460-268521 असा आहे.
तालुक्याचा प्रमुख महसूल अधिकारी म्हणून एक आदर्श तहसीलदार कसा असावा तर प्रशासकीय बाबींमध्ये निपुण, कर्तव्यदक्ष, कायद्याचे ज्ञान असलेला, आणि जनतेच्या तक्रारी तत्परतेने सोडवणारा असावा लागतो. याचे ज्वलंत उदाहरण म्हणून माहूरचे तरुण आणि तडफदार तहसीलदार अभिजित जगताप यांचे नाव त्यांच्या विशिष्ट कार्यशैलीवरुन तालुका प्रशासनातच नव्हे तर सर्वसामान्य नागरिकांमधूनही मोठ्या आदराने घेतले जाते.
त्याचाच एक भाग म्हणून तहसीलदार जगताप यांनी प्रशासकीय इमारतीच्या बाहेरील मुख्य गेटवर सूचना फलक लावून तहसील कार्यालय व परिसरात कोणत्याही प्रकारचे अनाधिकृत दलाल/एजंट यांना प्रवेश व काम करण्यास सक्त मनाई केली आहे.
या लोकहितवादी निर्णयाचे सर्वसामान्य नागरिकांमधून स्वागत करण्यात येत आहे.
नागरिकांना सर्व सुविधा त्यांच्या गावातच मिळाव्यात या हेतूने प्रत्येक नगरपंचायतला ऑनलाइनशी जोडण्यात आले असून शहरांमध्ये सुविधा केंद्र मार्फत सर्व कामे ऑनलाईन होत असतात. तशीच तहसील कार्यालयातही सर्व कामे विहित वेळेत पूर्ण करण्यात येत असून नागरिकांनी कुठल्याही दलालाशी संपर्क करू नये. कुठल्याही आमिषांना बळी न पडता थेट कार्यालयाशी संपर्क साधून वेळेत कामे पूर्ण करून घ्यावीत!
-अभिजीत जगताप,
तहसीलदार, माहूर






















