मुंबई : सार्वजनिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या युनियन बँक ऑफ इंडियाने आर्थिक वर्ष 2025 – 26 च्या तिसऱ्या तिमाहीत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. अत्याधुनिक ग्राहक सेवा देत ग्राहकांचा विश्वास संपादन केल्यामुळे बँकेला ५०१७ कोटी रुपयांचा निव्वळ नफा मिळाला असल्याची माहिती बँक प्रशासनाने दिली.
बँकेचा एकूण व्यवसाय ₹22.39 लाख कोटींच्या पुढे गेला आहे. सातत्यपूर्ण वाढ आणि मालमत्ता गुणवत्तेतील सुधारणा यामुळे ही प्रगती साध्य झाल्याचे बँकेने स्पष्ट केले.
31 डिसेंबर 2025 रोजी समाप्त झालेल्या तिमाहीत बँकेचा नफा मागील तिमाहीच्या तुलनेत 18.07 टक्क्यांनी वाढलेला आहे. या कालावधीत बँकेचा ऑपरेटिंग नफा ₹6,942 कोटी इतका राहिला, तर निव्वळ व्याज उत्पन्न (NII) 5.85 टक्क्यांनी वाढून ₹9,328 कोटींवर पोहोचले.
कार्यक्षमता निर्देशांकातही सुधारणा दिसून आली असून, निव्वळ व्याज मार्जिन (NIM) 2.76 टक्के, मालमत्तेवरील परतावा (RoA) 1.35 टक्के आणि भागधारक भांडवलावरील परतावा (RoE) 17.09 टक्के इतका नोंदवण्यात आला आहे. देशांतर्गत CASA गुणोत्तर 33.96 टक्क्यांवर स्थिर राहिले असून, कमी खर्चाच्या ठेवींवर बँकेचा भर कायम असल्याचे यावरून स्पष्ट होते.
किरकोळ, कृषी व सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग (RAM) क्षेत्रांवर बँकेचा धोरणात्मक भर कायम असून देशांतर्गत एकूण कर्जपुरवठ्यात या क्षेत्रांचा वाटा 58.84 टक्के इतका आहे. किरकोळ कर्जपुरवठ्यात वर्षभरात 21.67 टक्क्यांची वाढ झाली असून गृहकर्ज व वाहन कर्ज यामुळे ही वाढ साध्य झाली आहे. तसेच MSME क्षेत्रातील कर्जपुरवठा 19.75 टक्क्यांनी वाढला आहे.
मालमत्ता गुणवत्तेच्या बाबतीत बँकेने दहा वर्षांतील सर्वोत्तम कामगिरी नोंदवली आहे. एकूण अनुत्पादित कर्जे (Gross NPA) 3.06 टक्क्यांवर आली असून, नेट NPA केवळ 0.51 टक्के इतकी राहिली आहे. प्रोव्हिजन कव्हरेज रेशो 95.13 टक्क्यांपर्यंत वाढला असून बँकेच्या जोखीम व्यवस्थापनाची ही सकारात्मक बाब मानली जात आहे.
भांडवली स्थितीही भक्कम असून, CRAR 16.49 टक्के तर CET-1 गुणोत्तर 13.94 टक्के आहे, जे नियामक निकषांपेक्षा अधिक आहे. त्यामुळे भविष्यातील वाढीसाठी युनियन बँक ऑफ इंडिया सक्षम स्थितीत असल्याचे बँकेने नमूद केले आहे























