किनवट : महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ अन्वये किनवट नगर परिषदेच्या स्थायी व विविध विषय समित्यांची रचना आज नगर परिषद सभागृहात खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. पिठासीन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी जेनिथ चंद्र दोनथुला यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड प्रक्रिया संपन्न झाली.
नगराध्यक्षा सौ. सुजाता विनोद येंड्रलवार या स्थायी समितीच्या अध्यक्षा असून उपनगराध्यक्ष पठाण मोहम्मद हसन म. नूर खान हे पदसिद्ध उपसभापती आहेत. तसेच उपनगराध्यक्ष हे नियोजन व विकास समितीचे पदसिद्ध सभापती असल्याने या समितीची जबाबदारी हसन खान पठाण यांच्याकडे देण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम समितीच्या सभापतीपदी श्रीराम नारायण नेम्मानिवार, पाणीपुरवठा व जलनिस्सारण समितीच्या सभापतीपदी श्रीमती निलोफर निसार भाटी, स्वच्छता व सार्वजनिक आरोग्य समितीच्या सभापतीपदी श्रीमती अश्विनी आदर्श जागर्लावार, क्रीडा व सांस्कृतिक समितीच्या सभापतीपदी श्रीमती नुरसबा मुकद्दर शेख तर महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी श्रीमती प्रिती धिरज नेम्मानिवार यांची निवड करण्यात आली. महिला व बालकल्याण समितीच्या उपसभापतीपदी श्रीमती गुलबखत अकबर खान यांची निवड झाली. सर्व पक्ष व गटांच्या समन्वयातून ही निवड बिनविरोध पार पडली. निवड प्रक्रियेनंतर पिठासीन अधिकारी जेनिथ चंद्र दोनथुला यांनी सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून सभेचे कामकाज संपन्न झाल्याचे जाहीर केले.


















