लातूर :मौजे डिगोळ ग्रामपंचायतीचे उपसरपंच आणि विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीचे चेअरमन आदरणीय बाबासाहेब समर्थराव पाटील यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. दिनांक 1 नोव्हेंबर रोजी शनिवारी दुपारी 12.10 वाजता लातूर येथील सरकारी दवाखान्यात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने गावासह संपूर्ण तालुका आणि जिल्ह्यात शोककळा पसरली आहे. बाबासाहेब पाटील यांनी लातूर–पुणे–मुंबई अशा राज्यातील विविध प्रशासकीय यंत्रणेत आपली ओळख निर्माण केली होती. शिक्षण, आरोग्य आणि ग्रामविकास क्षेत्रात त्यांनी सातत्याने झटत गावाला नवी दिशा देण्याचे काम केले.
जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय आदी स्तरावर सतत पाठपुरावा करून डिगोळ व परिसरातील विकासकामांना चालना देण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. मनमिळाऊ स्वभाव, जनसंपर्कातील पकड आणि सर्वांना साथ घेऊन काम करण्याची त्यांची शैली सर्वांच्या मनात घर करून गेली होती. गावकऱ्यांसाठी सदैव धावून येणारे, गरजू विद्यार्थ्यांना मार्गदर्शन-सहाय्य करणारे, आरोग्य सुविधा आणि रस्ते-पाणी अशा मूलभूत सोयींसाठी झटणारे असे लोकप्रिय लोकनेते काळाच्या पडद्याआड गेल्याने ग्रामस्थांचे डोळे पाणावले.
“गावाच्या विकासासाठी अहोरात्र धावणारा आधारवड हरपला” अशा शब्दांत ग्रामस्थांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच परिसरातील सहकार, महसूल, पोलीस, आरोग्य, महावितरण विभागातील अधिकारी-कर्मचारी, शिरूर अनंतपाळ तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत सदस्य, सरपंच-उपसरपंच, सहकारी सोसायट्यांचे पदाधिकारी, राजकीय पक्षांचे नेते, कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येने डिगोळ येथे धावून आले. अंत्यदर्शनासाठी आणि श्रद्धांजली वाहण्यासाठी गावात मोठी गर्दी उसळली होती.
बाबासाहेब पाटील यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, आई-वडील, भाऊ असा मोठा बराचसा परिवार आहे. दिनांक 01 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी 5 वाजता त्यांच्या स्वतःच्या शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले. शोकाकुल वातावरणात सर्वांनी अश्रुपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. गावाच्या प्रगतीसाठी स्वतःचा जीव पणाला लावणाऱ्या या कर्तृत्ववान नेतृत्वास भावपूर्ण श्रद्धांजली.




















