मंगळवेढा – शहरात अंदाजे २०० पडक्या इमारती अस्तित्वात आहेत. या इमारतींमुळे शहरवासीयांना मोठ्या प्रमाणात समस्या भेडाळल्या आहेत. पडक्या इमारतींमध्ये कुत्र्यांना सुरक्षित आश्रयस्थान मिळाल्याने त्यांची संख्या झपाट्याने वाढली आहे. या कुत्र्यांनी आतापर्यंत अनेक नागरिकांचा चावा घेतला असून, विशेषतः लहान मुले आणि वृद्ध नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. रस्त्यावरून चालताना कुत्र्यांचा सुसाट धावत येणे, रात्रंदिवस भुंकणे यामुळे रहिवाशांचे जीवन त्रासदायक झाले आहे.याशिवाय, या इमारती घुश्या, उंदीर, डास आणि सापांसाठी आदर्श निवासस्थान ठरल्या आहेत.
घुश्या वाढल्याने डेंग्यू, मलेरिया सारख्या आजारांचा धोका वाढला आहे. उंदीर धान्याला खराब करतात, तर सापांच्या सतत दर्शनामुळे नागरिक घाबरून घराबाहेर पडण्यास धजावत नाहीत. शहराच्या प्रत्येक गल्लीत हे प्रमाण वाढलेले पहायला मिळते.गटारीजवळील पडक्या इमारतींमधून दगड, माती आणि कचरा गळून गटाऱ्या जाम होत आहेत. यामुळे पावसाळ्यात जलसंकट उद्भवते आणि नेहमी दुर्गंधी पसरते. नगरपालिकेच्या वारंवारच्या स्वच्छता मोहिमा अपयशी ठरत आहेत, कारण पडक्या इमारती असल्यास कचरा पुन्हा साठतो.नागरिकही जबाबदारी टाळत आहेत. प्रत्येक गल्लीतील पडक्या इमारतींमध्ये स्वतःचा घरगुती कचरा टाकण्याची सवय लागली आहे. परिणामी, उकिरड्याचे डोंगर तयार झाले असून, तेथील रहिवाशांना श्वास घेणे कठीण झाले आहे. आरोग्य धोका, पर्यावरणीय प्रदूषण आणि सुरक्षा खतरे वाढले आहेत.
मंगळवेढा नगरपरिषदेने तातडीने कारवाई करावी. पडक्या इमारतींच्या मालकांना १५ दिवसांची नोटीस बजावून परिसर स्वच्छ करणे आणि मुरुमकरण करण्याचे आदेश द्यावेत. न केल्यास नगरपालिकेने स्वतः स्वच्छता करून खर्च मालकांच्या मालमत्ता उताऱ्यावर चढवावा. यामुळे कायमस्वरूपी उपाययोजना होईल.या संदर्भात ‘एक दिवस गावासाठी’ मोहिमेअंतर्गत आज नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी प्रफुल्ल सोमदळे, सतीश दत्तू उपस्थित होते. शहरवासीयांनी एकत्र येऊन या समस्येवर तोडगा काढावा, असे आवाहन करण्यात आले.



























