सोलापूर – प्रतीक गोस्वामी, महाव्यवस्थापक, मध्य रेल्वे यांनी ०३.०२.२०२६ रोजी मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे आयोजित कार्यक्रमात मध्य रेल्वेच्या १२ कर्मचाऱ्यांना संरक्षा पुरस्कार प्रदान करून त्यांचा सत्कार केला. यामध्ये सोलापूर विभागातील दोघांचा सन्मान करण्यात आला.
कर्तव्यावर असताना कर्मचाऱ्यांनी दाखविलेली सतर्कता, प्रसंगावधान आणि कर्तव्यनिष्ठा यामुळे संभाव्य अपघात टळले व मागील काही महिन्यांत सुरक्षित रेल्वे संचालन सुनिश्चित झाले. या उल्लेखनीय कार्याच्या मान्यतेस्वरूप हे संरक्षा पुरस्कार प्रदान करण्यात आले. प्रत्येक पुरस्कारामध्ये पदक, प्रशस्तीपत्र, उत्कृष्ट सुरक्षा कार्याचा उल्लेख असलेले प्रशस्तिपत्र आणि रु ३,५००/- रोख पारितोषिक यांचा समावेश आहे.
सोलापूर विभागामध्ये उमेश रमेश बदर, कनिष्ठ अभियंता, कुर्डुवाडी, सोलापूर विभाग यांना ०३.११.२०२५ रोजी पायी गस्तीदरम्यान कि.मी. ३७३/०८ येथे जी जंपर तुटलेला आढळला. त्यांनी त्वरित संबंधित सर्वांना माहिती देऊन ट्रॅकची संरक्षा सुनिश्चित केले व संभाव्य अपघात टाळला तर भानुदास एन. शेळके, ट्रॅक मेंटेनर, अरग, सोलापूर विभाग यांना ३०.१२.२०२५ रोजी कर्तव्यावर असताना धावत्या मालगाडीच्या एका डब्याचे चाक सपाट झाल्याचे आढळले. त्यांनी तात्काळ संबंधितांना माहिती दिली व वेळेत करण्यात आलेल्या कार्यवाहीमुळे संभाव्य अपघात टळला.
महाव्यवस्थापक यांनी सर्व पुरस्कार प्राप्त कर्मचाऱ्यांचे कर्तव्यनिष्ठा आणि सतर्कतेबद्दल अभिनंदन केले तसेच त्यांच्या कृतीमुळे इतर रेल्वे कर्मचाऱ्यांनाही सतर्क राहून प्रवाशांची सुरक्षितता व रेल्वे मालमत्तेचे संरक्षा सुनिश्चित करण्यासाठी प्रेरणा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.
या प्रसंगी चंद्रकिशोर प्रसाद, प्रधान मुख्य संरक्षा अधिकारी तसेच इतर प्रधान विभाग प्रमुख आणि मध्य रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
















