बार्शी – तालुक्यातील खामगांव येथे एका शेतकऱ्याच्या शेळीपालन व्यवसायावर हिंसक प्राण्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या हल्ल्यात तब्बल ८ शेळ्यांचा जागीच मृत्यू झाला असून शेतकऱ्याचे सुमारे तीन लाख रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खामगांव येथील शेतकरी शिवाजी कात्रे यांनी आपल्या शेतामध्ये शेळीपालन व्यवसाय सुरु केला आहे. रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात हिंसक प्राणी शेळ्यांच्या गोठ्यात घुसला आणि शेळ्यांवर हल्ला केला. या हल्ल्यात ८ शेळ्यांचा जागीच मृत्यू झाला.
ही घटना पहाटेच्या सुमारास उघडकीस आली. सकाळी शेतात गेलेल्या शिवाजी कात्रे यांच्या निदर्शनास हा प्रकार आला. गोठ्यात मोठ्या प्रमाणात शेळ्या मृत अवस्थेत आढळल्याने त्यांना मोठा धक्का बसला. या घटनेमुळे कात्रे यांचे अंदाजे तीन लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.
तहसीलदार यांची कार्यतत्परता
सदरच्या घटनेबाबत माहिती मिळताच तहसीलदार एफ. आर. शेख यांनी तातडीने बार्शी वन विभाग अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली व घटनेचा पंचनामा करण्यास सांगितले.
वन विभागाचा पंचनामा
वनपाल आरजू पिरजादे यांनी या घटनेचा पंचनामा केल्यानंतर हा हिंसक प्राणी ‘तरस’ असण्याची शक्यता वर्तवली आहे. तरस या प्राण्याच्या पायांचे ठसे व नख्यांच्या रस्त्यांवरुन त्यांनी याची ओळख पटवली असल्याचे सांगितले. शेळ्यांवर हल्ला करण्याची पद्धत पाहता या प्राण्याने शेळ्यांच्या पाठीमागे, पायाला, पोटाला व नरड्याला जखमा केलेल्या दिसून येत आहेत.
वन विभागाच्यावतीने मृत शेळ्यांचा कायदेशीर पंचनामा करण्यात आला असून, आत्तापर्यंत १९ पैकी ८ शेळ्या मृत पावल्या असून, उर्वरित 11 शेळ्या गंभीर जखमी असून भविष्यात त्या मृत पावण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर या पंचनामेच्या अहवालानंतर वरिष्ठ स्तरावरुन कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यास नुकसान भरपाई मिळण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले.
या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. या घटनेनंतर शेतकऱ्याला तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.


























