अखेर उद्या अयोध्येत होणाऱ्या भव्य राम मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. रामललाची प्राणप्रतिष्ठा आणि मंदिर उद्घाटनाची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. एवढेच नव्हे तर रामललाची बालस्वरूपातील मूर्ती हि देखील गुरुवारी गर्भगृहात ठेवण्यात आली आहे.
उद्या म्हणजे 22 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रामललाच्या मूर्तीवर अभिषेक करण्यात येईल व त्यानंतर प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा पूर्ण होईल. परंतु यापूर्वी प्रभू श्रीरामाच्या मनमोहक बालस्वरूप मूर्तीचे फोटो समोर आले असून अजूनही अनेक लोकांना रामललाच्या मूर्तीमध्ये काय खास आहे आणि मूर्तीची सर्व वैशिष्ट्ये काय आहे हे माहिती नाही. चला तर मग आपण ते जाणून घेऊयात..
मूर्तीवर भगवान विष्णूचे दहा अवतार
रामललाच्या या मूर्तीसोबत दगडापासून आकाराची चौकट तयार करण्यात आली आहे. त्यावर भगवान विष्णूचे दहा अवतार कोरण्यात आले आहेत.
ज्यामध्ये मत्स्य, कूर्म, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बुद्ध आणि कल्की यांचे अवतार आहेत. यासोबतच मूर्तीच्या एका बाजूला गरूड तर दुसऱ्या बाजूला हनुमान दिसत आहेत.
एकाच दगडात कोरली मूर्ती
यासोबतच ही मूर्ती एकाच दगडापासून कोरण्यात आली आहे. ही मूर्ती तयार करताना दुसरा दगड जोडलेला नाही.
रामललाच्या या मूर्तीमध्ये मुकुटाच्या बाजूला सूर्यदेव, शंख, स्वस्तिक, चक्र आणि गदा दिसेल. मूर्तीमध्ये रामललाचा डावा हात धनुष्यबाण धरण्याच्या मुद्रेत दाखवला आहे. मूर्तीचे वजन सुमारे 200 किलो आहे. मूर्तीची उंची 4.24 फूट आणि रुंदी तीन फूट आहे.