मराठा आरक्षणासाठी गेल्या काही महिन्यांपासून आरपारचा लढा देणारे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी 10 फेब्रुवारीपासून पुन्हा बेमुदत उपोषणाचा इशारा दिला आहे. अशातच जरांगे पाटील नवा पक्ष स्थापन करणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. याबाबत जरांगेंनी रोखठोक भूमिका सांगितली आहे.
मनोज जरांगे राजकीय पक्ष स्थापन करणार का?
मनोज जरांगे पाटील नवा पक्ष स्थापन करणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यावर जरांगे पाटील म्हणाले, हे आमच्या डोक्यात पण नाही. आमचा राजकीय अजेंडा देखील नाही. गोरगरीब मराठ्यांची पोरं मोठी झाली पाहिजेत हे आमचं ध्येय आहे. त्यापासून आम्ही हटणार नाही. सोशल मीडियावर काय येतंय, त्यावर लक्ष देऊ नका. आरक्षण कसे मिळेल याकडे लक्ष द्या असं मनोज जरांगे म्हणाले आहेत.