सोलापूर : ए. जी. पाटील तंत्रनिकेतन महाविद्यालयात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अंतर्गत तंत्रशिक्षणामधील सर्वांगीण परिवर्तन या विषयावर आधारित तीन दिवसीय ऑनलाईन फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅम आयोजित करण्यात आला होता. हा प्रोग्राम महाविद्यालयातील ह्युमॅनिटी अँड सायन्स विभाग व ISTE यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केला गेला. या कार्यशाळेत राज्यातील विविध तंत्रशिक्षण संस्थेमधील शंभरहून अधिक प्राध्यापकांनी आपला सहभाग नोंदविला.
या कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. रणजीत सावंत, ISTE चे चेअरमन महाराष्ट्र व गोवा सेक्शन यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले. उद्घाटन प्रसंगी बोलताना त्यांनी सांगितले की, NEP 2020 हे केवळ एक धोरण नसून भारतीय शिक्षण व्यवस्थेला जागतिक दर्जावर नेणारा एक मार्ग आहे. शिक्षणामध्ये फक्त ज्ञान पुरेसे नसून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होणे गरजेचे असते, असेही त्यांनी सांगितले. महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी आपल्या सदिच्छा व्यक्त करून सर्व सहभागी प्राध्यापकांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे समन्वयक प्राध्यापिका चांगला ढेपे यांनी कार्यशाळेचा उद्देश आणि महत्त्व सांगितले.
कार्यशाळेच्या तीन दिवसीय ऑनलाइन सत्रात प्रत्येक दिवशी दोन सत्र ठेवण्यात आले होते आणि या सत्रात शैक्षणिक क्षेत्रातील नामवंत व्यक्तींनी मोलाचे मार्गदर्शन केले. यात पहिल्या दिवशी अंजू रॉली मॅडम यांनी अध्यापन आणि मूल्यमापन पद्धतीतील बदल या विषयावर आणि डॉ. माया इंगळे मॅडम यांनी शिक्षणातील आऊट कम बेस्ड एज्युकेशन यातील अमुलाग्र बदल यावर बहुमोलाचे मार्गदर्शन केले.
दुसऱ्या दिवसाच्या सत्रात सुद्धा सर्व सहभागी प्राध्यापकांसाठी उत्कृष्ट असे मार्गदर्शनपर सत्र आयोजित केले गेले, यात डॉ. कल्लूरकर सर यांनी भारतीय ज्ञानाचा तंत्रशिक्षणात झालेला समावेश या विषयावर आणि डॉ. सज्जन मॅडम यांनी आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे विद्यार्थ्यांचा वाढता सहभाग या विषयावर मार्गदर्शन केले. तिसऱ्या दिवसातील सत्रात रोहिणी बापट मॅडम यांनी तणाव मुक्त आणि आंतरिक संतुलन कसे राखले पाहिजे यावर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी सहभागी प्राध्यापकांचे कौतुक केले. सहभागी प्राध्यापकांमधून काही प्राध्यापकांनी कार्यशाळेबद्दलचा आपला अनुभव याप्रसंगी व्यक्त केला. कार्यशाळेचे समन्वयक प्राध्यापक व्ही आर आवटे यांनी सर्वांचे आभार मानले.
या उपक्रमासाठी अध्यक्ष श्री सिद्धेश्वर अण्णाराव पाटील, सचिव श्री शिवानंद सिद्धेश्वर पाटील, आय. एस. टी. ई. (ISTE) नवी दिल्ली चे अध्यक्ष डॉ. पी. के. देसाई, संस्थेचे कॅम्पस डायरेक्टर व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एम ए चौगुले व उपप्राचार्य श्री एस के मोहिते चे विशेष मार्गदर्शन लाभले; तसेच या उपक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व विभाग प्रमुखांनी आणि आयोजन समितीने विशेष परिश्रम घेतले.
























