सोलापूर : शहरातील कचरा संकलन करणाऱ्या झोन चार आणि पाच कडील घंटागाडी कामगारांनी आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधत संप पुकारला. जुळे सोलापूर येथील डी मार्ट च्या मागील बाजूस असलेल्या झोन पाचच्या आवारात एकत्र येत सुमारे दीडशे कामगारांनी जोरदार निदर्शने केली. गेल्या दोन महिन्यापासून पगार दिला जात नसल्याने संताप व्यक्त केला.
सोलापूर शहरातील कचरा घरोघरी जाऊन संकलित करण्यासाठी महापालिका प्रशासनाने घंटागाडीच्या माध्यमातून कचरा संकलन करण्याचा मक्ता दिला आहे. या मक्तेदारांकडून कंत्राटी पद्धतीने घंटागाडी कामगार ठेवण्यात आले आहेत. त्यापैकी झोन चार आणि पाच कडील घंटागाडी कर्मचाऱ्यांनी आज बुधवारी सकाळपासूनच दोन महिन्यापासून पगार झाला नसल्याकडे लक्ष वेधत संप पुकारला. जुळे सोलापूर येथील डी मार्ट च्या मागे असलेल्या झोन क्रमांक पाच च्या आवारात एकत्र येऊन जोरदार निदर्शने केली.
कामगांराची पिळवणूक होत असल्याचा आरोप या कामगारांनी केला आहे. घंटागाडी मक्तेदार सर्व घंटागाडी कर्मचाऱ्यांची मानसिक, शारिरिक व आर्थिक पिळवणूक करीत आहेत. त्यांच्या त्रासाला कंटाळून बेमुदत संप करीत असल्याचे या घंटागाडी कामगारांनी स्पष्ट केले आहे. घंटागाडी कामगारांना दोन महिने झाले पगार दिला नाही.
शासन जीआर असतांना आजतगायत नियमाप्रमाणे किमान वेतन मिळत नाही. साप्ताहिक पगारी सुट्टी असतांना मिळत नाही. राष्ट्रीय सणाची सुट्टी मिळत नाही.
पगार स्लिप दिली जात नाही. पीएफ, इएसआय पगारातुन कपात होतो पण त्याचा लाभ मिळत नाही. स्कॅनरचे आमचे काम नसतांना करायला लावतात. दर महिन्याच्या 10 तारखेच्या आत पगार मिळावा. कामगारांना सुरक्षा साहित्य पुरवले जात नाही, त्यामुळे आमचे आरोग्य धोक्यात आहे. सर्व विषयावर कोणी बोलले तर कामावरून काढण्याची धमकी दिली जाते. याकडे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात येत असल्याचे कामगारांनी सांगितले.
या सर्व मागण्या मान्य होईपर्यंत बेमुदत संप राहील. कामगार हिताचे निर्णय घ्यावे व सर्व कामगारांची मानसिक, शारिरिक व आर्थिक पिळवणूक थांबवावी अशी मागणी या कामगारांनी केली आहे. दुसऱ्या दिवशीही हा संप सुरूच राहणार असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, सोलापूर महापालिका घनकचरा व्यवस्थापन विभागाचे मुख्य सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार, अनिल चराटे यांनी संबंधित कामगारांशी चर्चा केली. संबंधित मक्तेदाराला सूचना केल्या जातील, असे आश्वासन दिले. मात्र ठोस कार्यवाही झाली नसल्याने दुसऱ्या दिवशी हा संप सुरू ठेवणार असल्याचे या कामगारांनी म्हटले आहे.
बाबा गड्ड्याला कधी नेणार आहात ?
सर्व जाऊन येत आहेत…!
बाबा गड्ड्याला कधी नेणार आहात ?
सर्वजण जाऊन येत आहेत… आम्हालाही न्या की… असा हट्ट लहान मुले करीत आहेत. मात्र गेल्या दोन महिन्यापासून आम्हा घंटागाडी कामगारांना पगार दिला नाही. सोलापूर शहरातील घरोघरचा कचरा संकलित करणाऱ्या घंटागाडी कामगारांच्या मुलांना पैशाअभावी गड्डा यात्रा पाहता येत नाही. लहान मुले सतत हट्ट करत आहेत. त्यांना काय सांगायचे ? घरातील राशन संपलय, महिन्याच्या गोळ्या संपल्यात… काय करावं काही समजत नाही, अशी व्यथा घंटागाडी कामगारांनी मांडली.

















