रामटेक येथे दुचाकीची कट लागल्यावरुन झालेल्या भांडणात एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे. गाडीला कट का मारली म्हणून दोघांमध्ये वाद होऊन जबर मारहाण झाली होती.
रामटेक येथील कार्तिक पौर्णिमेनिमित्त गडमंदिरावरून परत येत असताना होमगार्ड आणि त्याच्या साथीदाराने दुचाकीचा कट लागल्याच्या कारणावरून दोन तरुणांना मारहाण केल्याची घटना रामटेक पोलिस ठाण्याअंतर्गत उघडकीस आली आहे. या मारहाणीत एक तरुण गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला आहे. विवेक खोब्रागडे (रा. सीतापूर वनपवनी, देवलापर) असे मृत तरुणाचे नाव आहे. तर फैजान पठाण हे जखमी तरुणाचे नाव आहे. सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी रामटेक पोलिसांनी आरोपींवर खुनासह ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृतक विवेक हा त्याचा मित्र फैजान याच्यासोबत मोटारसायकलवरून रामटेक येथे शोभायात्रा पाहण्यासाठी गेला होता. शोभायात्रा पाहून झाल्यानंतर ते दोघेही गडमंदिरावरून पवनीकडे निघाले असता आरोपी मनीष भारती हा रोडवर त्याची मोपेड दुचाकी घेऊन त्याचा साथीदारासह उभा होता. आरोपीच्या दुचाकीला कुणीतरी कट मारला. त्यात आरोपी मनीषची पत्नी आणि मुलीला किरकोळ दुखापत झाल्याचे समजते.
दरम्यान, शोभायात्रा पाहून परतत असताना मनीष भारती, जितेंद्र गिरी, सत्येंद्र गिरी आणि त्यांच्या साथीदारांनी गडमंदिर रस्त्यावर दोघांना अडवले. तू आमच्या गाडीला धडक दिली. त्यामुळे आमचा गाडीचे नुकसान झाले, त्यामुळे तुम्ही आम्हाला नुकसाभरपाई द्या, अशी मागणी करत त्यांनी त्यांना मारहाण केली. जातिवाचक शिवीगाळ केल्याचाही आरोप आहे. त्यानंतर आरोपी मनीष आणि त्याच्या साथीदारांनी मारहाण थांबविली आणि गाडीची नुकसानभरपाई म्हणून १० हजार रुपयांची मागणी केली.
दोघेही जखमी असताना मनीषने फैजानला घरच्यांना फोन करायला सांगितले. फैजानने त्याच्या भावाला घटनास्थळी बोलावले. मनीषने फैजलच्या भावाकडून ऑनलाइन १० हजार रुपये घेतले. त्यानंतर जखमी फैजानने विवेकला घरी आणले. मात्र, या घटनेची वाच्यता केली नाही. सकाळी विवेकने शरीर व पोट दुखत असल्याचे वडिलांना सांगितले. त्याला तातडीने स्थानिक खासगी रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी कामठी किंवा नागपूर येथे हलविण्याचा सल्ला दिला, दरम्यान, त्यांनी विवेकला कामठी येथील चौधरी रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.
याप्रकरणी रामटेक पोलिसांनी विश्वनाथ खोब्रागडे यांच्या फिर्यादीवरून खुनाचा आणि अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करून आरोपी मनीष बंडूजी भारती (३७), जितेंद्र गजेंद्र गिरी (२३) आणि सत्येंद्र गजेंद्र गिरी (२५ रा. सर्व वंश. अटक अंबाडा वॉर्ड, रामटेक) आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. अन्य आरोपी सध्या फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. याप्रकरणी उपविभागीय पोलिस अधिकारी आशित कांबळे तपास करत आहेत.