छत्तीसगडच्या कोरबा जिल्ह्यातील 2 आदिवासी गावांनी आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक वर्षांपासून या गावांमध्ये पिण्याचे पाणी व वीजपुरवठा या पायाभूत सुविधा उपलब्ध होऊ शकलेल्या नाहीत. त्यामुळे मूलभूत सुविधांच्या अभावाचा निषेध नोंदवण्यासाठी या गावांनी बहिष्काराचा निर्णय घेतला आहे.
कोरबा जिल्ह्याच्या रामपूर विधानसभा मतदारसंघातील सारडीह आणि बागधारीदंड या गावांनी विधानसभा निवडणुकांच्या मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला. तेथील गावकरी करत असलेल्या आंदोलनाचे नेतृत्व पहाडी कोरबा या आदिवासी संघटनेकडे आहे. गावात रस्ते, पाणी, वीज या पायाभूत सुविधा मिळत नसल्याने मतदानावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन करणारी पत्रके सारडीह आणि बगधारीदंड या दोन गावांतील नागरिकांना वितरित करण्यात आली आहेत. निवडणूक आयोगाने सोमवारी राजस्थानसह मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोरामच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या होत्या. त्यानुसार छत्तीसगडमध्ये 7 आणि 17 नोव्हेंबर रोजी 2 टप्प्यात मतदान होणार आहे. यामध्ये राज्याती 2.03 कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यापार्श्वभूमीवर दोन आदिवासी गावांनी मतदानावर बहिष्काराची घोषणा केल्यामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे.