नवी दिल्ली: सर्वोच्च न्यायालयानं दिशाभूल करणाऱ्या आणि खोट्या जाहिरातीवरुन पतंजली कंपनीला कठोर शब्दांत झापल्यानंतर योगगुरु रामदेव बाबांनी पत्रकार परिषद घेत त्यांची भूमिका स्पष्ट केली. आमच्याकडे ज्ञान-विज्ञानाचं भांडार आहे. गर्दीच्या आधारावर खऱ्या खोट्याचा निर्णय घेतला जाऊ शकत नाही, असं रामदेव बाबा म्हणाले.
मेडिकल माफिया खोटा प्रचार करतात. पतंजली कधीही खोटा प्रचार, जाहिराती करत नाही. उलट पतंजलीनं स्वदेशी आंदोलनाला प्रोत्साहन दिलं. खोटी माहिती पसरवली जात आहेत. त्याचा पर्दाफाश व्हायला हवा. आजारांच्या नावाखाली लोकांना घाबरवण्यात येत आहे, अशा शब्दांत रामदेव बाबांनी त्यांची भूमिका मांडली.
मी कधीही न्यायालयासमोर हजर राहिलेलो नाही. पण या प्रकरणात मी स्वत: सर्वोच्च न्यायालयासमोर उपस्थित राहण्यास तयार आहे. मला संपूर्ण संशोधनासह हजर राहण्याची परवानगी दिली जावी. आम्हाला आमचे रुग्ण आणि संशोधन न्यायालयासमोर आणण्याची संधी देण्यात यावी. १९४० मध्ये ड्रग्ज अँड मॅजिक रेमेडी ऍक्ट तयार करण्यात आला. त्यातील त्रुटी समोर आणण्याची संधीही दिली जावी, असं रामदेव बाबा म्हणाले.
तुम्ही एकदा आजारी पडलात की संपूर्ण आयुष्य औषधं खावी लागतील असं रुग्णांना सांगितलं जातं. आम्ही तर म्हणतो, औषधं सोडून द्या. तुम्ही नैसर्गिक जीवन जगा. आम्ही शेकडो रुग्णांना सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांसमोर हजर करण्यास तयार आहोत. संपूर्ण संशोधन त्यांच्यासमोर ठेवण्याची आमची तयारी आहे, असा पवित्रा त्यांनी घेतला.
आमच्याकडे शेकडो शास्त्रज्ञ आहेत. आम्ही प्रोटोकॉलच्या अधीन राहून रिसर्च पेपर इंटरनॅशनल जर्नलमध्ये प्रकाशित केले आहेत. त्यानंतर आम्ही दावे करत आहोत. खऱ्या खोट्याचा निर्णय संपूर्ण देशासमोर व्हायला हवा. ऍलोपॅथीवाल्यांची संख्या जास्त आहे. त्यांच्याकडे लाखो करोडोंचं साम्राज्य आहे. त्यांच्या डॉक्टर्सची, रुग्णालयांची संख्या अधिक आहे. त्यामुळे त्यांचा आवाज जास्त ऐकला जातो, असं रामदेव बाबा म्हणाले.
आम्ही दरिद्री नाही. आमच्याकडे ऋषीमुनींच्या ज्ञानाचा वारसा आहे. पण आमची संख्या कमी आहे. आम्ही एकटे असलो, तरीही आमची संस्था जगभरातील ड्रग्ज माफियांशी दोन हात करण्यास तयार आहे. स्वामी रामदेव कधीही घाबरला नाही आणि हरलेला नाही. आम्ही शेवटपर्यंत लढू, असं म्हणत त्यांनी दंड थोटपले. सर्वोच्च न्यायालयाबद्दल आम्हाला कायम आदर राहील, असंही त्यांनी म्हटलं.