अमरावती: तुम्ही मटण खाऊन आले त्यामुळे भारत हरला, असं म्हणत दारूच्या नशेत थोरल्याने धाकट्या भावाची रॉड आणि काठीने हल्ला करुन हत्या केली. तसेच, वडिलांवरही प्राणघातक हल्ला चढवल्याची घटना अमरावती येथे घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. अंकित रमेश इंगोले (वय २८) असे मृतक आणि रमेश गोविंद इंगोले (वय ६५, दोघेही रा. अंजनगाव बारी) असे जखमीचे नाव आहे. तर प्रवीण रमेश इंगोले (वय ३२, रा. अंजनगाव बारी) असे आरोपीचे नाव आहे. रमेश आणि त्यांचा लहान मुलगा अंकित हे दोघे रविवारी क्रिकेट वर्ल्ड कप अंतिम सामना बघण्यासाठी अंकित वडिलांसोबत मामाच्या घरी गेला होता. तेथे मटणाचा बेत आखण्यात आला होता. जेवण केल्यानंतर दोघेही दुपारी २ वाजता घरी पोहचले. ते सोबत प्रविणसाठी मटणाचा डबा सुद्धा घेऊन आले होते. त्यावेळी प्रविण दारुच्या नशेत भारत- ऑस्ट्रेलिया अंतिम सामना पाहत होता.
दरम्यान, सायंकाळी ऑस्ट्रेलियाची फलंदाजी सुरु झाल्यानंतर भारताचा क्रिकेटमधील कामगिरीचा आलेख सातत्याने ढासळत असल्याने अस्वस्थ झालेला प्रवीण सतत दोघांना शिवीगाळ करत होता. रात्री ९ च्या सुमारास भारत सामना हारल्यानंतर प्रविण आणखीनच संतापला. “तुम्ही मटण खाऊन आले म्हणून भारत मॅच हरला”, असं म्हणत त्याने दोघांना शिविगाळ सुरू केली. त्यामुळे चिडलेल्या वडिलांनी प्रविणला मोबाईल फेकून मारला. यानंतर प्रविणने रागाने वडिलांच्या पायावर जबर मारहाण केली. अडवण्यासाठी अंकित गेला असता प्रविणने अंकितच्या डोक्यात लोखंडी रॉडने चार- पाच वार केले. अंकितने बचावासाठी घराबाहेर पळून जाण्याचा प्रयत्न केला असता ठेच लागल्याने तो खाली पडला.
त्यावर प्रविणने अंकीतवरही लोखंडी रॉड आणि काठीने हल्ला चढवून त्याची हत्या केली. गावकऱ्यांनी रमेश यांना रुग्णालयात दाखल करून याबाबत बडनेरा पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला आणि मृतदेहाला शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी रमेश इंगोले यांच्या तक्रारीवरून प्रवीणविरुद्ध हत्या आणि प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले. पुढील तपास ठाणेदार नितीन मगर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.