महाराष्ट्रात ओबीसीसाठी स्वतंत्र मंत्रालय, ओबीसींना राजकीय आरक्षण देण्याचे व ते वाचविण्याचे काम देवेंद्र फडणवीस यांनी केले, तर केंद्रातील मोदी सरकारने विविध योजनांच्या माध्यमातून ओबीसींचे हित साधले आहे. ज्याप्रकारे बिहारमध्ये सर्व समाजाचा डेटा तयार करण्यात आला. त्याच प्रकारे महाराष्ट्रातही ओबीसी समाजाचा डेटा तयार करावा, अशी मागणी मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस व श्री अजित पवार यांच्याकडे करणार आहे, असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.
ते हिंगणघाट (जि. वर्धा) येथे ओबीसी जागर मेळाव्यात बोलत होते. भाजपाच्या ओबीसी जागर यात्रेची सुरुवात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी सेवाग्राम आश्रम येथून उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरवी झेंडी दाखवून केली. सेवाग्राम येथून सुरू झालेली ही यात्रा पहिल्या टप्प्यात १६०० किमीचा प्रवास करणार आहे. विदर्भातील ९ लोकसभा क्षेत्रातून ही यात्रा ओबीसींसाठी केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचा जागर करणार आहे. शेतकऱ्यांचे हित साधले जावे, युवकांना रोजगार मिळवा, महिलांचे कल्याण व्हावे आणि ओबीसीमध्ये सामील असणाऱ्या १८ पगड जाती, १२ बलुतेदार व ३५० हून अधिक उपजातींना न्याय मिळवून देण्याचे काम जागर यात्रा करेल असा विश्वास श्री बावनकुळे यांनी व्यक्त केला. मेळाव्यापूर्वी बावनकुळे यांच्या उपस्थितीत 800 बाईकची भव्य रॅली काढण्यात आली. या रॅलीने हिंगणघाटचे लक्ष वेधून घेतले. मेळाव्यानंगतर जागर यात्रा देवळी, कळंब, यवतमाळ मार्गाने पुढे निघाली.
यावेळी राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर, ओबीसी मोर्चा राष्ट्रीय महामंत्री व महाराष्ट्र प्रभारी खा.संगमलाल गुप्ता, खासदार रामदास तडस, ओबीसी मोर्चा प्रदेशाध्यक्ष संजय गाते, भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रभारी डॉ. आशिषराव देशमुख, विदर्भ विभागीय संघटन सरचिटणीस डॉ. उपेंद्र कोठेकर, आ. समीर कुणावार, आ. रामदास आंबटकर, आ.पंकज भोयर, आ. दादाराव केचे, जिल्हाध्यक्ष सुनील गफाट, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष वरुण पाठक, मोहन चव्हाण, अशोक जिवतोडे, किशोर दिघे, अंकुश ठाकूर, संजय डेहणे, आकाश पोहाने, विनोद विटाये, वामन चंदनखेडे, भूषण पिसे, उषाताई थुटे, अर्चना वानखेडे, बंडू राऊत, डी.डी.सोनटक्के, गम्पूजी घाटोळे यांच्यासह मोठ्या संख्येने ओबीसी समाजातील कार्यकर्ते उपस्थित होते.
• विकास सांगता येत नाही म्हणून संभ्रम!
पंतप्रधान मोदी यांनी ओबीसी समाजातील घटकांना नीटच्या माध्यमातून मेडिकल शिक्षण, केंद्रीय नवोदय विद्यालय, सैनिक शाळा, आर्थिक उत्थानासाठी वेंचर कॅपिटल योजना, किसान सन्मान निधीच्या माध्यमातून उत्थानासाठी काम केले. त्यांच्याच कार्यकाळात भारत चंद्रावर पोहचला, सूर्याकडे जातो आहे. मोदींचा पराभव करण्यासाठी २८ विरोधी पक्ष एकत्र आले आहेत. जेव्हा जनतेला विकास सांगता येत नाही तेव्हा संभ्रम निर्माण करण्याचे काम कॉंग्रेसकडून केले जाते. कॉंग्रेस सरकारने कधीही ओबीसी समाजाला न्याय दिला नाही, असेही ते म्हणाले.
• राष्ट्रवादीचे नेते निनावे यांचा भाजपा प्रवेश
हिंगणघाट येथील ओबीसी जागर मेळाव्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस व सुवर्णकार समाजाचे नेते सुभाष निनावे यांच्यासह मोठ्या संख्येने युवकांनी व इतर कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला. त्यांचे श्री बावनकुळे यांनी पक्षात स्वागत केले व ओबीसी समाजासाठी काम करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
• बापूंच्या स्मृतीस्थळी अभिवादन
महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस आणि श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सेवाग्राम येथील बापू कुटीला भेट दिली. महात्मा गांधी यांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेतले व प्रार्थनासभेत सहभागी होत अभिवादन केले. प्रदेशाध्यक्ष श्री बावनकुळे यांनी सेलू येथे भाजपा कार्यकर्त्यांनी आयोजित केलेल्या आरोग्य शिबिराचे उद्घाटन केले. पवनार व सेवाग्राम येथे आयोजित केलेल्या ‘मेरी माटी मेरा देश’ उपक्रमात सहभागी झाले.