मराठा आरक्षण विषयक मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चा मुख्यमंत्री निवासस्थानावर धडकणार होता. मात्र त्याआधीच पोलिसांनी तो रोखला. मुंबईत मराठा क्रांती मोर्चाचा आंदोलन केले जाणार असल्याचा एक मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी मरिन ड्राईव्ह परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात केला होता. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले.
व्हायरल मेसेजनुसार मराठा आंदोलक मोर्चासाठी गिरगाव चौपाटीपासून मोर्चाला सुरुवात करून हा मोर्चा मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी जाणार होता. याच पार्श्वभूमीवर गिरगाव चौपाटी ते मुख्यमंत्र्यांचे वर्षा निवासस्थान या मार्गावर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. मोर्चा चौपाटी परिसरापासून काही अंतर पुढे आला. त्यानंतर पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाही आणि कायदा सुव्यवस्थेच्या कारणास्तव मोर्चेकऱ्यांना ताब्यात घेतले.
मराठा क्रांती मोर्चाच्या मागण्या काय?
आरक्षण हे मराठा म्हणूनच पाहिजे आणि महत्त्वाचं म्हणजे, कायद्यात टिकणारं पाहिजे, या मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चाकडून हे आंदोलन केलं जात असल्याचं आंदोलकांनी सांगितले.