जालना ते छत्रपती संभाजी नगर समृद्धी महामार्गावर पॉवर ग्रीड ट्रान्समिशन अतिउच्च दाबवाहिनी टॉवरचे काम करण्यात येणार आहे. यासाठी पाच दिवस तीन तासांसाठी समृद्धी महामार्ग बंद ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता रामदास खलसे यांनी दिली आहे.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार, समृद्धी महामार्गावर पॉवर ग्रीड ट्रान्समिशन अतिउच्चता वाहिनीचे काम करण्यात येणार आहे. या कामासाठी जालना ते छत्रपती संभाजीनगर दरम्यान दोन्ही बाजूंनी वाहतूक मंगळवार दिनांक १० ऑक्टोबर ते गुरुवार दिनांक १२ ऑक्टोबर दरम्यान दुपारी १२ ते साडेतीन आणि २५ व २६ ऑक्टोबर रोजी १२ ते ३ या वेळेत समृद्धी महामार्ग बंद राहणार आहे.
पर्यायी मार्ग कोणता?
तब्बल ५ दिवस समृद्धी महामार्ग बंद ठेवण्यात येणार असल्याने प्रवाशांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून पर्यायी मार्ग सुचवण्यात आला आहे. नागपूरकडून मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांना पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सावंगी इंटरचेंज- जालना महामार्गावरून विरुद्ध दिशेने निधोना-जालना समृद्धी महामार्गावर प्रवेश करून नागपूरकडे वळवण्यात येणार आहे. तसंच इंटरचेंज-निधोना एमआयडीसी जालना महामार्गावरून छत्रपती संभाजीनगर केंब्रिज शाळा उजवीकडे वळून सावंगी बायपास सावंगी इंटरचेंजहून शिर्डीच्या दिशेने प्रवासी जाऊ शकतात.