शहरातील महापालिकेची परिवहन व्यवस्था जवळजवळ कोलमडलेली आहे. शहरवासीयांसमोर शहरांतर्गत प्रवासासाठी रिक्षाशिवाय पर्यायच नाही. शहरात सध्य स्थितीला किमान १५ हजार रिक्षा धावताहेत, असे सांगण्यात येते. पण शहरातील अधिकृत रिक्षा थांब्यांची संख्या केवळ २३९ इतकी आहे. या पार्श्वभूमीवर नव्याने ४०० थांबे बनवण्याची मागणी रिक्षा संघटनांनी केली आहे.
अवैध रिक्षांमधून होणारी प्रवाशी वाहतूक वाढली आहे. अवैध रिक्षांतील वाहतूक म्हणजे अपघाताला निमंत्रण आहे. शहरातील रस्ते विविध प्रकारच्या अतिक्रमणांमुळे अरुंद झालेले आहेत. त्यातच रिक्षांची संख्या वाढलेली आहे. त्यामुळे नव्या रिक्षा थांब्यांची गरज निर्माण झाली आहे. रहदारीस अडथळा होणार नाही आणि प्रवाशांना सोयीचे होईल अशा दृष्टीने थांबे असावेत. नवीन थांबे ठरवताना आरटीओकडून पाहणी व्हावी, असे निवेदन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांना देण्यात आले .