विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांना मुख्यमंत्री करण्यासाठी कामाला लागा, असे आवाहान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार निलेश लंके यांनी केले होते. अजित पवार हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील असे वक्तव्य लंके यांनी याआधी अनेकवेळा केले होते. २००४ साली मुख्यमंत्रीपदाची संधी आयती चालून आलेली असतानाही अजित पवार यांना उपमुख्यमंत्रीपदावर समाधान मानावे लागले होते. आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांना याबाबत प्रश्न विचारण्यात आला असता शरद पवार यांनी एका वाक्यात हा विषय संपवला.
काय म्हणाले शरद पवार?
अजित पवार यांना मुख्यमंत्री करा, अशी राष्ट्रवादीच्या आमदारांची इच्छा आहे, त्यांनी तसे बोलून दाखवले असल्याचा प्रश्न पत्रकाराने विचारला. तेव्हा पवार म्हणाले, “कुणाला काही आवडेल, पण आमच्याकडे संख्या असली पाहीजे ना. आमच्याकडे आज संख्या नाही. क्रमांक एकचा पक्ष असतो तर आमच्या सगळ्या सहकाऱ्यांना विश्वासात घेऊन आम्ही काही निर्णय घेतले असते. पण आज आमच्याकडे शक्ती नाही, संख्या नाही. त्यामुळे त्यावर भाष्य करणे योग्य वाटत नाही.”