अमेरिकेची संशोधन संस्था हिंडेनबर्ग रिसर्चने, भारत आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती गौतम अदानी यांच्या नेतृत्वातील अदानी समूहाबाबत मोठ्या हेराफेरीचा अहवाल प्रदर्शित केल्यानंतर शेअर बाजारात अक्षरशः त्सुनामी आली. या अहवालात अदानी समूहावर करण्यात आलेल्या गंभीर आरोपांचे पडसाद भारतीय शेअर बाजारावरही दिसून येत फक्त दोन दिवसात मार्केट १,६४७ अंकांनी कोसळला. परिणामी गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान झालं.
याशिवाय अदानी समूहातील कंपन्यांच्या जवळपास सर्वच समभागात १९ ते २७ टक्क्यांची घसरण झाली असून अदानी ग्रुपचे बाजार भांडवलात (मार्केट कॅप) सुमारे ४ लाख कोटी रुपायांनीं घट नोंदली गेली. अशा परिस्थितीत आता अदानी समूहातील गुंतवणूकदारांची नक्कीच धाकधूक वाढली असेल. शेअर बाजरातील परिणाम आपल्या हिशोबाने फिरवणे आणि हिशोबात घोळ, याकडे अमेरिकन रिसर्च फर्मने बोट उचलल्यावर अदानी समूहाचे शेअर्स धडधक आपटले. याचा फटका शेअर बाजारालाही बसला आणि आठवड्याच्या शेवटच्या व्यापाराच्या दिवशी ६० हजार अंकांखाली बंद झाला. दुसरीकडे, अदानी समूहाचे शेअर्समध्ये पडझड सुरु झाल्यापासून त्यात गुंतवणूक करणारे बँकिंग समभागही गडगडले.
अदानी समुहावरील आरोपानंतर गुंतवणूकदारांमध्ये अस्थिरतेचे वातावरण आहे. या दरम्यान, “हे गुंतवणूकदारांच्या निवडीवर अवलंबून आहे. आम्ही प्रयत्न करून त्यावर प्रभाव टाकणार नाही. आम्हाला वाटते की समूहात गुणवत्ता आहे आणि दीर्घकालीन संभावना खूप मजबूत राहतील. पायाभूत सुविधांमध्ये ज्या प्रकारची वाढ त्यांनी कर्जाशिवाय केली आहे, तशी वाढ होऊ शकत नाही. मी निश्चितपणे किमान एफपीओमध्ये ‘बाय’चा (खरेदी) सल्ला देईन आणि मी म्हणेन की अंबुजा आणि बंदरे या किमतीत खूपच आकर्षक दिसत आहेत,” आयआयएफएल सिक्युरिटीजचे संचालक संजीव भसीन यांनी म्हटले.
हिंडेनबर्ग अहवालाच्या परिणामामुळे अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स १८.५२ टक्क्यांनी घसरले. त्याचप्रमाणे अदानी पोर्ट्स १६ टक्क्यांनी, अदानी पॉवर पाच टक्के, अदानी ग्रीन एनर्जी १९.९९ टक्के आणि अदानी टोटल गॅस २० टक्क्यांनी घसरले. मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स इंडस्ट्रीज या देशातील सर्वात मौल्यवान कंपनीचे शेअर्स २.३२ टक्क्यांनी घसरले.