अधिक महिन्याचा शेवटचा सोमवारी आणि सलग आलेल्या सुट्या यामुळे त्र्यंबकेश्वर येथे भाविकांची अफाट गर्दी झाली आहे. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. शासकीय विश्राम गृह ते सितारा हॉटेल हे अवघ्या अर्धा किमी अंतर पार करण्यासाठी दीड – दोन तास वेळ लागत आहे. नागरिकांनी रस्त्याच्या दोन्ही बाजूने गाड्या उभ्या केल्याने वाहतुकीची कोंडी होत आहे.बस स्थानकापासून दीड किमी पायपीट करत जीवाचा आटापिटा करत भाविक शहरात येत आहेत.
मंदिरात दर्शनासाठीची परिस्थिती त्यापेक्षा गंभीर आहे. पूर्व दरवाजा दर्शनबारी गंगेच्या काठाने गौतम तलावा पर्यंत पोहचली.दोनशे रुपये दर्शन बारी गर्दी पाहून बंद करण्यात येत होती. दर्शनाला पाच तास वेळ लागेल हे पाहून अनेक भाविक दर्शन न घेताच परत माघारी फिरलेले दिसत होते.अनेक भाविक मंदिराच्या समोर असलेल्या डिजिटल स्क्रीनला हात जोडून समाधान मानत होते. दरम्यान, त्र्यंबकेश्वर मंदिराच्या समोर असलेली परिस्थिती पाहता चेंगराचेंगरी सारखी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.