राज्यभरात बहुचर्चित असलेली अमरावती पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत तब्बल ३० तासानंतर विजयाची घोषणा होत महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज लिंगाडे विजयी झाले आहेत. लिंगाडे यांनी ४६ हजार ३४४ मते घेतली. तर भाजचे उमेदवार डॉक्टर रणजीत पाटील यांना ४२ हजार ९६२ मते मिळाली. या अटीतटीच्या लढतीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज लिंगाडे हे विजयी झाले आहेत.
या निवडणुकीत भाजपचे उमेदवार माजी मंत्री व देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी रणजीत पाटील यांचा पराभव झालाय. यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मोठा धक्का बसला आहे. पदवीधर निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर फॉर्म भरण्याच्या शेवटच्या दिवशी धीरज लिंगाडे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. जुनी पेन्शन योजना, बेरोजगारांचे प्रश्न यावर धीरज लिंगाडे यांना मतदान खेचून आणण्यात यश आले. तर भाजपचे उमेदवार डॉक्टर रणजीत पाटील यांचा सर्वसामान्य मतदारांशी संपर्क तुटला होता. त्यांच्याबद्दल पक्षांतर्गतही मोठ्या प्रमाणात नाराजी होती. कार्यकर्त्यांवर त्यांनी अविश्वास दाखवला होता. गृहराज्यमंत्री असताना डॉक्टर रणजीत पाटील यांनी अनेक महत्त्वाच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आला होता.