परिक्षेत गुण कमी दिल्याचा राग मनात ठेऊन एका विद्याथ्याने चक्क प्राध्यापकाला चाकुने भोसकले. या घटनेत ते ३० वर्षीय प्राध्यापक गंभीर जखमी झाले आहेत. मार्डी रोडवरील संत अच्युत महाराज हॉस्पिटलसमोर सोमवारी सायंकाळी ५.३५ च्या सुमारास ही घटना घडली. चैतन्य अरविंद गुल्हाने (३०, रा. महालक्ष्मीनगर) असे मृत्यूशी झुंज देत असलेल्या प्राध्यापकाचे नाव आहे.
याप्रकरणी, अमर सभादिंडे (३०, महादेवखोरी) या सहकारी प्राध्यापकाच्या तक्रारीवरून फ्रेजरपुरा पोलिसांनी आरोपी विद्यार्थी अर्पित जयवंत देशमुख (२१, रा. सातेगाव, ता. अंजनगाव सुर्जी) याच्याविरूद्ध कलम ३०७ (खुनाचा प्रयत्न) अन्वये गुन्हा दाखल केला. घटनेपासून आरोपी अर्पित फरार झाला आहे. चैतन्य गुल्हाने हे मार्डी रोडस्थित डॉ. राजेंद्र गोडे इन्स्टिट्युट ऑफ फॉर्मसी या महाविद्यालयात प्राध्यापक असून, ते ॲनालिसीस हा विषय शिकवतात. तर अर्पित देशमुख हा त्याच कॉलेजमध्ये बी फॉर्मसीच्या अंतिम वर्षाला आहे. अर्पितला कमी गुण मिळाले म्हणून त्याने आपल्या पोटात चाकूने वार केले, असे गुल्हाने यांनी आपल्या सहकाऱ्यांना सांगितले. दरम्यान, गुल्हाने यांच्या पोटातील छोट्या व मोठ्या आतडीला गंभीर मार लागल्याने त्यांना खोलवर जखमा झाल्या. त्यामुळे त्यांच्यावर येथील एका खासगी रूग्णालयात शस्त्रक्रिया देखील करण्यात आली.