लातूर दि.13 जानेवारी- कितीही संकटे आली तरी देशमुख वाडा आहे तिथेच राहणार, उलट मला बोलावण्यार्यांनीच स्वगृही परतावे असे अवाहन आ. माजी मंत्री आ. अमित देशमुख यांनी विटा येथील कार्यक्रमांत केले. यातून त्यांनी भाजपत जाण्याच्या वावड्यांना उत्तर दिले आहे. विटा येथील नेचर केअर फर्टिलायझर्सचे संस्थापक, जयंत वामन तथा बाबा बर्वे यांच्या कृषी क्षेत्रातील अनमोल कामगिरीबद्दल आयोजित कृतज्ञता सोहळयात माजी मंत्री अमित देशमुख बोलत होते. या कार्यक्रमात माजी मंत्री आ. अमित देशमुख यांनी विलासरावांच्या शैलीत स्पष्टीकरण दिले.
महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर काँग्रेसला खिंडार पडणार, अशा चर्चा होत्या. त्यात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी मंत्री आ. अमित देशमुख भाजपमध्ये जाण्याच्या वावड्या सुरू होत्या. तसेच भारत जोडो यात्रेतील सहभागावरूनही दोन्ही नेते कायम चर्चेत राहिले होते. सध्या राज्यात शिवसेना-भाजपचे सरकार आहे किंवा तसे तूर्त तरी म्हणावे लागत आहे. हे सरकार वैध की अवैध हे सर्वोच्च न्यायालयात सुनावणी साठी प्रलंबित आहे. आता कोर्ट सुरू होणार आहे. त्यामुळे सर्वांनी शांतता राखा. आताची पाच वर्षे ही चमत्कारिकच राहिली. सध्या राज्यात तिसरे सरकार सुरु आहे. पहिले सरकार हे अडीच दिवसाचे होते. दुसरे सरकार हे अडीच वर्षाचे तर तिसरे सरकार हे सध्या सुरु आहे. आणि चौथे सरकार कधीही येऊ शकेल. काहीही सांगता येत नाही. अशी परिस्थिती आहे. असा इशारा देखील देशमुखांनी दिला. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये चांगले काम सुरु झाले होते. आताच्या सरकारला नाव ठेवायचे तरी काय. मुख्यमंत्री हे आपले आहेत आणि उपमुख्यमंत्री भाजपचे आहेत. असा टोला त्यांनी लगावला. सध्या कोण कुठल्या पक्षात आहे हे तुम्हाला कळते का? हा आम्हाला प्रश्न पडला आहे. असेही ते म्हणाले. आता निवडणुका कधी होतील हेही सांगता येत नाही. अस्थिर परिस्थितीला आपण सगळे तोंड देत आहोत असे सांगतानाच त्यांनी आम्हाला बोलावणार्यांनीच स्वगृही परतावे असे अवाहन लोकनेते विलासराव यांच्या शैलीत दिले. यावरून आ. अमित देशमुखांच्या भाजप प्रवेशाच्या वावड्यांना त्यांनी प्रथमच लातूर बाहेरील व्यासपिठावरून उत्तर दिले. तर काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी यापुर्वीच आ. अमित देशमुखांच्या भाजप प्रवेशावर प्रतिक्रीया दिली होती. यामुळे आ. अमित देशमुख यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना पुर्णविराम मिळाला आहे. मात्र अमित देशमुख यांनी संभाजीरावांना के लेल्या स्वगृही परतण्याच्या अवाहनाला प्रतिसाद मिळतो का ? याची चर्चा आता लातूरच्या राजकीय क्षेत्रात होत आहे.