राज्यात दिवसेंदिवस प्रेमप्रकरणातून गुन्हेगारीच्या घटना वाढत आहेत. त्यातच आता आणखी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. प्रेमासाठी मुलाने आपल्या बापालाच संपवले आहे. या घटनेनंतर पंढरपूर तालुक्यात खळबळ उडाली आहे.पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथे चक्क मुलाने आपल्या जन्मदात्या पिताला पेटवून मारून टाकले असल्याची घटना घडली आहे. हे हत्या प्रकरण एका प्रेम प्रकरणातून घडले. यामध्ये मृत अफजल बागवान यांचा मुलगा सोहेल यासह तीन अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
तीन अल्पवयीन मुलांच्या आईचे अफजल बागवान यांच्याशी प्रेम संबंध होते. तर तीन अल्पवयीन मधील एका मुलीचे अफजल बागवान यांचा मुलगा सोहेल याच्याशी प्रेम संबंध होते. मात्र, अफजलला सोहेलचे आणि संबंधित अल्पवयीन मुलीचे प्रेम संबंध अमान्य होते. यातूनच प्रेयसीने आपला प्रियकर असणाऱ्या सोहेलच्या मदतीने त्याच्याच पित्याचा अर्थात अफजलचा काटा काढण्याचे ठरवले.
त्यांनी आखलेल्या कटानुसार, पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथे अफजल बागवान यास घेऊन जात आधी त्याच्या डोळ्यात लाल तिखट टाकण्यात आले. यानंतर डोक्यावर दगड घालून पेट्रोल टाकून त्याला पेटवून देण्यात आले. यामध्ये अफजल बागवान याचा मृत्यू झाला आहे. या घटनेने पंढरपूर तालुक्यात एकच खळबळ उडाली. प्रेमासाठी चक्क मुलाने आपल्या बापानेच संपवले आहे. याबाबत पंढरपूर तालुका पोलीस अधिकचा तपास करीत आहेत.