मोठी बातमी समोर येत आहे. 2024 च्या निवडणुकीसाठी विरोधकांकडून भाजपला पर्याय देण्यासाठी एक मजबूत मोट बांधण्यात येत आहे. यासाठी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांनी दोनच दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. त्यानंर आज आदित्य ठाकरे यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली आहे. या भेटीची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. आदित्य ठाकरे यांनी केजरीवाल यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली.
आदित्य ठाकरे यांच्या भेटीबाबत अरविंद केजरीवाल यांनी ट्विट करत माहिती दिली आहे. आज माझ्या निवासस्थानी आदित्य ठाकरे यांनी भेट दिली. त्यांचं आदरातिथ्य करण्याची संधी मला मिळाली. यावेळी देशात सध्या सुरू असलेल्या राजकीय घडामोडींवर चर्चा झाल्याचं अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी अरविंद केजरीवाल यांनी मुंबईमध्ये मातोश्रीवर येऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती.