भारत वि. ऑस्ट्रेलिया पहिल्या एकदिवसीय सामन्यात मोहम्मद शमीनं भेदक गोलंदाजी केली. त्यानं ५ फलंदाजांना बाद केलं. यानंतर त्यानं मुलाखतीदरम्यान हर्षा भोगलेंची विकेट काढली.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना भारतानं जिंकला आहे. ऑस्ट्रेलियानं दिलेल्या २७७ धावांच्या लक्ष्याचा भारतानं सहज पाठलाग केला. ऋतुराज गायकवाड आणि शुभमन गिलनं दिलेल्या शतकी सलामीमुळे दुसऱ्या डावात भारतानं झोकात सुरुवात केली. दोघांनी अर्धशतकं झळकावली. तत्पूर्वी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीनं पाच फलंदाजांना बाद करत ऑस्ट्रेलियाचा डाव २७६ धावांवर रोखला.
सलामीवीर मिशेल मार्शला स्वस्तात माघारी धाडत शमीनं भारताला चांगली सुरुवात करुन दिली. त्यानंतर शमीनं स्टिव्ह स्मिथ, मार्क स्टॉयनिस, मॅथ्यू शॉर्ट आणि सीन अबॉट यांना तंबूचा रस्ता दाखवला. भारतात ऑस्ट्रेलियाविरुद्ध ५ बळी टिपण्याची कामगिरी याआधी कोणत्याही भारतीय गोलंदाजाला जमली नव्हती. ही किमया शमीनं साधली. विशेष म्हणजे शमीनं तीन फलंदाजांचा त्रिफळा उडवला. यात दिग्गज फलंदाज स्मिथचाही समावेश होता.
ऑस्ट्रेलियाचा डाव २७६ धावांवर आटोपल्यानंतर समालोचकांनी शमीसोबत संवाद साधला. त्यावेळी शमीचा हजरजबाबीपणा दिसला. मैदानात ऑस्ट्रेलियन फलंदाजांच्या दांड्या उडवणाऱ्या शमीनं पहिल्या डावानंतर मुलाखत देताना समालोचक हर्षा भोगलेची विकेट काढली. त्यामुळे शमीची मुलाखत चर्चेचा विषय ठरली. शमीचं मिश्किल उत्तर ऐकून भोगलेंना हसू आवरलं नाही.
तुम्हाला मैदानावर उष्मा जाणवत होता का, असा प्रश्न भोगलेंनी शमीला विचारला. त्यावेळी भोगले समालोचन कक्षात बसले होते आणि शमी मैदानात उभा होता. भोगलेंच्या प्रश्नाला शमीनं क्षणाचाही विलंब न लावता मजेशीर उत्तर दिलं. ‘हो. उष्मा जाणवत होता. कारण तुम्ही एसीत बसला होतात आणि आम्ही मैदानात होतो,’ असं शमीनं म्हणताच सगळेच हसू लागले.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक फलंदाज बाद करणाऱ्या भारतीय गोलंदाजांच्या यादीत शमी दुसऱ्या स्थानी आहे. पहिल्या क्रमांकावर कपिल देव आहेत. त्यांनी ४१ सामन्यांत ४५ विकेट्स घेतल्या आहेत. त्या खालोखाल शमीचा नंबर लागतो. शमीनं २३ सामन्यांत ३७ बळी घेतले आहेत. तर अजित आगरकरनं २१ सामन्यांत ३६ फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला आहे. यानंतर जवागल श्रीनाथनं २९ सामन्यांत ३३ फलंदाज बाद केले आहेत.