अजून आमची शिवसेनासोबत बोलणी सुरू आहे..त्यामुळे काही शब्द देता येणार नाही. बोलणी झाल्यावर बघू… आमचं पटल की नाही, ते आम्ही ठरवू, पहिले कोण मैत्रीण होईल ते तर ठरवू द्या… मग बघू कुणाला फुल द्यायचे ते… आमचं अजून नातं जमलं नाही… फक्त लाईन मारणं सुरू आहे, असल्याची मिश्किल टिप्पणी प्रकाश आंबेडकरांनी वंचित आघाडी आणि शिवसेना युतीवर केली.
नाशिक मध्ये सध्या निवडणुकीचे वारे सुरू असून नाशिक विभागात पदवीधर मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीकडून रतन बनसोडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. याच पार्श्वभूमीवर राजकीय नेते मंडळी दौरे सुरू झाले असल्याने प्रकाश आंबेडकरांनी देखील यावेळी नाशिकमध्ये येऊन माध्यमांची संवाद साधला. यावेळी त्यांनी प्रत्येक पत्रकारांशी संवाद साधत शिवसेना युतीबाबत महत्त्वाचं विधान केलं ते यावेळी म्हणाले की, शिवसेना ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे यांना युतीसाठी काँग्रेस राष्ट्रवादीलाही सोबत घ्यावयाचे आहे. यामुळे त्यांच्याकडून ते प्रयत्न केले जात आहेत. मला काँग्रेस- राष्ट्रवादी मान्य आहे. पण त्यांना अपेक्षित असलेली घराणेशाही मान्य नाही. ओबीसी, गरीब मराठ्यांचे वकीलपत्र मी सोडून द्यावे, असे ते म्हणतात. त्यांना घराणेशाही, निजामशाहीची सत्ता पाहिजे असल्याचे ते म्हणाले.
तसेच आमचा काँग्रेस राष्ट्रवादीला विरोध नाही, उद्धव ठाकरे यांच्यासोबतही आमची चर्चा सुरू असून ते स्वतः काँग्रेस राष्ट्रवादीने सोबत यावे, यासाठी प्रयत्न करत आहेत, मात्र त्यांना घराणेशाही हवी आहे, पण मला ती घराणेशाही मान्य नाही, आम्ही हार घालायला तयार आहोत, पण ते मान पुढे करत नाही असे मत आपल्या शैलीत वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक प्रकाश आंबेडकर यांनी नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. तसेच नाशिक पदवीधर निवडणुकीत रतन बनसोडे (उमेदवार) गेल्या सहा महिन्यांपासून मतदारांची नोंदणी करण्याचे काम करत आहे. पक्ष बाजूला ठेऊन व्यक्तिगत राजकारण सुरू आहे..याला आळा बसला पाहिजे, आम्ही आता स्पर्धेत आहोत..अमरावती, नागपूर येथे आमची परिस्थिती चांगली आहे. महाविकास आघाडीने इथल्या उमेदवाराला पाठिंबा दिला, तो त्यांचा प्रश्न आहे. या निवडणुकीत काही जण पैसेवाले आहेत. दहा दहा कोटी रुपये खर्च करू शकतात. पण कार्यकर्त्यांच्या जोरावर आम्ही निवडणूक लढवू गेल्या चाळीस वर्षापासून धनशक्ती विरोधात लढत आहे, त्यामुळे याही निवडणुकीत जोरदार प्रयत्न करू असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
ते पुढे म्हणाले कि, उद्धव ठाकरे यांची प्रयत्न सुरू आहेत, आम्ही त्यांना मुभा दिली आहे. तुम्ही त्यांना घेऊन या, आम्ही हार टाकून स्वागत करतो, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. उद्धव ठाकरे यांना मी देखील सांगितले की, तुम्ही स्वतःला मर्यादा घाला की किती दिवस प्रयत्न करायचे, ज्या दिवशी लक्षात आले की आता जमत नाहीये, त्या दिवशी आपलं जमलं असं जाहीर करून टाकायचे असे आंबेडकर म्हणाले. उद्धव ठाकरे यांच्यासोबत आमची बोलणी सुरू असून त्यांची चर्चा काँग्रेस-राष्ट्रवादी सोबत सुरू आहे. यामुळे युतीला विलंब होत असल्याचेही आंबेडकरांनी स्पष्ट केले. आमचा त्यांना सोबत घेण्यास विरोध नाही, मात्र काँग्रेसचा मला विरोध हे माहीत नाही असेही आंबेडकरांनी यावेळी स्पष्ट केले.