सरकार कधी धनगर तर कधी मराठा समाजाच्या मागे असल्याचे दाखवत दोन्हीही समाजांना आरक्षणाच्या मागणीवर झुलवत ठेवत आहे, असे म्हणत दोन्ही समाजाच्या लोकांनी एकत्र येत या दोन्ही समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी संयुक्त मागणी केली आहे. येथील विश्रागृहात धनगर व मराठा समाजाचे लोक एकत्र आले. त्यांनी दोन्ही समाजाच्या आरक्षणासाठी एकत्रित लढा देण्यासाठी आणाभाका घेतल्या.
बैठकीवेळी नेत्यांनी सरकार दोन्ही समाजांना आरक्षणाच्या मुद्द्यावर झुलवत ठेवत असल्याची भावना बोलून दाखवली. शिवाय गैरसमज पसरवल्याने बंधुभावाने वागणाऱ्या या दोन्ही समाजात वितुष्ट येत आहे. यावर सर्वांचे एकमत झाले. इथून पुढे या दोन्ही समाजांनी एकमेकांसाठी आरक्षणाची एकत्रित मागणी करण्याचे ठरले. तसेच संयुक्तिक मागणीसाठी नियोजनाची दिशा ठरवण्यासाठी दोन्ही समाजाची लवकरच एकत्र बैठक लावण्याचे ठरले. त्यानुसार जमलेल्या दोन्ही समाजाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत मराठा धनगर आरक्षण मिळालेच पाहिजे, धनगर मराठा समाजाचा विजय असो, अशी घोषणाबाजी केली. दोन्ही समाजाच्या एकीने शिवाय राज्यात एक चांगला संदेश गेला आहे.