हँगझोऊ येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत देदिप्यमान कामगिरी करत पदक जिंकणाऱ्या भारतीय क्रीडापटूंचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केलेय. यासंदर्भात पंतप्रधानांनी ट्विट (एक्स) करत या खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.
आशियाई क्रीडा स्पर्धेंतर्गत पुरुषांच्या कॅनो दुहेरी हजार मीटर स्पर्धेत अर्जुन सिंग आणि सुनील सिंग यांनी कांस्य पदक जिंकल्याचे मोदींनी कौतुक केलेय. तर 4×400 मीटर अंतराच्या मिश्र रिले स्पर्धेत रौप्यपदक जिंकल्याबद्दल मोहम्मद अजमल, विठ्या रामराज, राजेश रमेश आणि वेंकटेशन सुभा यांचे अभिनंदन केले आहे. तसेच महिलांच्या 3 हजार मीटर स्टीपलचेस प्रकारात कांस्यपदक जिंकल्याबद्दल प्रिती लांबा हिचे अभिनंदन केले आहे. प्रिती लांबा हिची चिकाटी आणि निर्धार इतरांसाठी प्रेरणा देणारा तेजस्वी प्रकाशदीप बनल्याचे पंतप्रधानांनी आपल्या संदेशात नमूद केलेय.