इंदापूर येथे १२० फुट खोल विहिरीमध्ये पडलेल्या चारही मजुरांचे मृतदेह आज (शुक्रवार) दुपारी सव्वा बारा वाजेपर्यंत सापडले. चार ही मजुर तालुक्यातील बेलवाडी गावातील असल्याने गावावरती शोककळा पसरली.
म्हसोबाचीवाडी येथे विहिरीला रिंग (सिमेंट-क्रॉक्रिटीकरणचा कठडा) तयार करण्याचे काम गेल्या तीन-चार महिन्यापासुन सुरु होते. यासाठी बेलवाडी गावातील दहा ते बारा मजूर एका ठेकेदाराकडे रोजंदारीवरती काम करीत होते. मंगळवार (ता.१) रोजी पोर्णिमा असल्यामुळे बहुतांश कामगार देवदर्शनासाठी गोंदावले येथे गेले होते. सोमनाथ लक्ष्मण गायकवाड (३२), जावेद अकबर मुलाणी (३०, मूळ रा.बेलवाडी, हल्ली रा. निंबोडी), परशुराम बनसीलाल चव्हाण (३०), लक्ष्मण उर्फ मनोहर मारुती सावंत (५५) हे चौघे जण सकाळी लवकर कामावरती गेले. दुपारनंतर विहिरीच्या रिंगचे काम करीत असताना अचानक मुरुम व मातीचा ढिगारा कोसळल्याने चार मजूर विहिरीमध्ये कोसळले.त्यांच्या अंगावरती मुरुम व माती पडल्याने ढिगाऱ्याखाली गाडले गेल्याची घटना घडली.