विहिरीचं काम सुरू असताना अचानक मातीचा ढिगारा कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत चार कामगार मातीच्या ढिगाऱ्याखाली दबले असून त्यांना बाहेर काढण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातल्या म्हसोबाची वाडी या गावात ही घटना घडली आहे. स्थानिक नागरिक आणि एनडीआरएफच्या जवानांच्या सहाय्याने घटनास्थळी बचावकार्य जारी आहे. विहिरीच्या कडेला रिंग टाकण्याचं काम सुरू असताना ही दुर्घटना घडली असून त्यानंतर आता जेसीबी आणि पोकलेनच्या सहाय्याने मातीचा ढिगारा बाजूला करण्याचे काम सुरू आहे. विहिरीच्या वरचा भाग कच्चा असल्यानेच ही दुर्घटना घडल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, इंदापूर तालुक्यातील म्हसोबाची वाडी या गावात विहिरीच्या कडेला रिंग टाकण्याचं काम सुरू होतं. त्यासाठी बेलवाडी गावातील चार कामगार आले होते. परंतु विहिरीला रिंग टाकण्याचं काम सुरू असतानाच अचानक मुरुम आणि मातीचा ढिगारा आत कोसळला. त्यामुळं चारही कामगार मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकले. सोमनाथ लक्ष्मण गायकवाड, जावेद अकबर मुलानी, परशुराम बन्सीलाल चव्हाण आणि मनोज मारुती चव्हाण अशी आत अडकलेल्या कामगारांची नावं आहे. दुर्घटनेची माहिती समजताच स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केलं आहे. याशिवाय एनडीआरएफचे जवानही घटनास्थळी दाखल झाले आहे.
दुर्घटनेची माहिती दोन्ही गावात वाऱ्यासारखी पसरली असून त्यामुळं शेकडो नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. त्यानंतर जेसीबी आणि पोकलेनच्या सहाय्याने मातीचा ढिगारा बाजूला हटवण्याचं काम सुरू आहे. इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील, भिगवण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार घटनास्थळी दाखल झाले आहे. आमदार दत्तात्रेय भरणे भल्या पहाटे घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य सुरू आहे. चारही कामगारांना ढिगाऱ्याखाली दबून बराच वेळ झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा संशय नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.