पावसाळा आता महिनाभरच राहिला आहे, तरीदेखील उजनी १८ टक्क्यांवरच आहे. त्यामुळे धरणाच्या ४३ वर्षांच्या इतिहासात आठ वर्षांचा अनुभव चिंताजनक असल्याने उन्हाळ्यातील संभाव्य टंचाईचा अंदाज घेऊन सध्या ना पिण्यासाठी ना शेतीसाठी पाणी, अशी भूमिका घेतली जात आहे. आता पंढरपूर व सोलापूर शहरासाठी साधारणत: २० सप्टेंबर दरम्यान एकदाच पाणी सोडले जाणार असून गुरुवारी (ता. ७) पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील त्यावर अंतिम निर्णय घेतील.
सोलापूर, पुणे, नगर जिल्ह्यांसह धाराशिव, कर्जत-जामखेड, बार्शी, कुर्डुवाडी, करमाळ्यासह जिल्ह्यातील १०० पेक्षा अधिक ग्रामपंचायती व सहापेक्षा अधिक ‘एमआयडीसीं’ना आणि अंदाजे २० लाख शेतकऱ्यांना उजनीचाच आधार आहे. १९८० मध्ये पहिल्यांदा उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरले. त्यानंतर १९८७-८८ मध्ये १९९५-९६ आणि २००० ते २००३ या काळात धरणातील अत्यल्प पाणीसाठ्याने जिल्ह्याची चिंता वाढविली होती.