जिल्हा परिषदेच्या शाळा ५ मार्चपासून सकाळच्या सत्रात भरणार आहेत. उन्हाचा तडाखा आता दिवसेंदिवस वाढू लागला असून दरवर्षीप्रमाणे यंदाही उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या सर्वच शाळा सकाळी साडेसात ते साडेअकरा वाजेपर्यंत भरणार आहेत. दूर अंतरावरून येणाऱ्या विद्यार्थ्यांना उन्हाचा त्रास होऊ नये, या हेतूने हा निर्णय घेतला जातो.दरवर्षी उन्हाळ्यात सोलापूर जिल्ह्याचे तापमान प्रचंड असते.
उन्हाळ्यात सर्वाधिक तापमान असलेल्या राज्यातील टॉपटेन जिल्ह्यांमध्ये सोलापूर नेहमीच अव्वल राहिला आहे. सध्या शनिवारी तापमानाचा पारा ३७.६ अंश सेल्सिअस पर्यंत चढलेला होता.सोमवारी तापमान ३६.४ अंश सेल्सिअस पर्यंत होते. उन्हाचे चटके चिमुकल्यांना बसणार नाहीत, याची खबरदारी शालेय शिक्षण विभागाकडून दरवर्षीच घेतली जाते. मात्र वर्षभरातील सार्वजनिक तथा शासकीय सुट्ट्यांचा विचार करून कधीपासून सकाळच्या सत्रात शाळा भरवता येईल, याचा कृती आराखडा तयार केला जातो.
उन्हाळ्यात उष्माघाताचा धोका असतो आणि उन्हामुळे अध्यापनाला देखील अडचणी निर्माण होतात. त्यामुळे उन्हाळ्याच्या सुरवातीला १ मार्च ते ३० एप्रिल या दोन महिन्यांत शाळांची वेळ सकाळीच असते. यंदा १ मार्च ऐवजी ५ मार्चपासून सकाळच्या सत्रात शाळा सुरु होणार आहेत. पण, प्राथमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना त्यासंबंधीची माहिती देतील. त्यानंतर तेच सोमवारी त्यासंबंधीचा अंतिम निर्णय घेणार आहेत
कडक उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या दोन हजार ९९७ शाळा सकाळच्या सत्रात भरतील. १ मार्च की ५ मार्चपासून शाळांच्या वेळा बदलतील, यासंदर्भातील अंतिम निर्णय मुख्य कार्यकारी अधिकारी पुढील आठवड्यात घेतील. त्यानंतर सर्व शाळांमध्ये त्या निर्णयानुसार अंमलबजावणी केली जाईल. असे सोलापूर जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी संजय जावीर यांनी सांगितले आहे.