उत्तर प्रदेशच्या शाहजहापूरमध्ये दोन कुटुंबांमध्ये झालेला वाद वेगळ्याच वळणावर येऊन पोहोचला आहे. एका कुटुंबानं दुसऱ्यावर मांजरीच्या हत्येचा आरोप केला. तर दुसऱ्या कुटुंबानं कबुतरांवर विषप्रयोग झाल्याचा दावा केला. दोन्ही कुटुंबांनी पोलीस ठाणं गाठलं. त्यानंतर या संपूर्ण प्रकरणाची चर्चा पंचक्रोशीत सुरू आहे.
जलाल नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत वारिस अली आणि मारू परिवार वास्तव्यास आहेत. दोन्ही कुटुंबांमध्ये रस्त्यावरून वाद झाला. यानंतर दोन्ही कुटुंबांचं मांजर आणि कबुतरांवरून भांडण झालं. मारू यांची मुलगी रुखसार बानो, माना बानो आणि आबिद यांनी आमच्या कबुतरांच्या दाणांमध्ये विष कालवून त्यांना मारून टाकल्याचा आरोप वारिस अली यांनी केला. दोन्ही घरांचं छत एकमेकांना लागून आहे. तर रुखसार बानो यांनी महिन्याभरापूर्वी वारिस यांच्यावर मांजरीच्या हत्येचा आरोप केला होता.
तुमच्या कबुतरांना विष देऊन संपवू अशी धमकी आबिद आणि रुखसार यांनी दिल्याचं वारिस म्हणाले. यानंतर काही दिवसांनी त्यांची मांजर परतली. मात्र त्यानंतर माझ्या ७८ पैकी ३५ कबुतरांचा मृत्यू झाल्याचं वारिस यांनी सांगितलं. रुखसार, माना आणि आबिद यांनी विषारी दाणे देऊन माझ्या कबुतरांना मारलं, असा दावा वारिस यांनी केला. प्रकरण पोलीस ठाण्यात गेलं. झालेला प्रकार पाहून पोलीस चक्रावले. पोलिसांनी वारिस अलीच्या तक्रारीनंतर भारतीय दंड विधानाच्या कलम ४२८ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
कबुतरांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. या प्रकरणात कारवाई केली जाईल, असं पोलिसांनी सांगितलं. दोन्ही कुटुंबांच्या संघर्षात मुक्या पक्ष्यांचा जीव गेला आहे. या प्रकरणात कबुतरांनी हकनाक प्राण गमावला आहे.