एक देश एक निवडणूक समितीची पहिली बैठक आगामी 23 सप्टेंबरला होणार आहे. माजी राष्ट्रपती आणि समितीचे अध्यक्ष रामनाथ कोविंद यांनी आज, शनिवारी ही माहिती दिली.
केंद्रीय कायदा मंत्रालयाने एक समिती स्थापन केली आहे. सध्याची कायदेशीर चौकट लक्षात घेऊन देशात एकाच वेळी निवडणुका घेण्याच्या मुद्द्याचे परीक्षण करणे हा त्याचा उद्देश आहे. लोकसभा, विधानसभा, नगरपालिका आणि पंचायतींच्या निवडणुका एकाच वेळी घेता येतील की नाही, याची चाचपणी केली जाईल. ही समिती एक देश, एक निवडणूक या प्रस्तावाशी संबंधित कायदेशीर बाबी पाहणार असून सर्वसामान्यांचे मतही घेणार असल्याचे सांगण्यात आले. यापूर्वी 6 सप्टेंबर रोजी गृहमंत्री अमित शहा आणि कायदामंत्री अर्जुनराम मेघवाल यांनी माजी राष्ट्रपती कोविंद यांची भेट घेतली होती. सुमारे तासभर चाललेल्या या बैठकीचे वर्णन सौजन्यपूर्ण बैठक असे करण्यात आले. अमित शहा या समितीचे सदस्य असून अर्जुनराम मेघवाल हे विशेष सदस्य आहेत.