महामंडळात निवड झालेल्या मात्र अंतिम नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या चालक – वाहकांकडून नियुक्तीसाठी लाचखोरीचा संकेत देणारा एक व्हिडीओ समोर आला आहे. नागपूर जिल्ह्यातील धापेवाडा बस स्थानकावरचा हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओमध्ये एसटी महामंडळात 2019 च्या सरळ सेवा भरतीने निवड झालेल्या चालक आणि वाहकांकडून अंतिम नियुक्तीसाठी पैसे घेतले जात असल्याचे दिसत आहे. धक्कादायक बाब म्हणजे तीन हजार रुपये घेऊन निवड झालेल्या चालक आणि वाहकांना नियुक्तीपूर्वीची अत्यंत महत्वाची अंतिम चाचणी त्यांनी यशस्वीरित्या पूर्ण केल्याचे प्रमाणित केलं जाईल, असं आश्वासन दिल्यानंतर हे रुपये घेतले जात आहे.
एसटी महामंडळात सरळ सेवा भरती पद्धतीने 2019 मध्ये नागपूर जिल्ह्यासाठी 183, तर राज्यभरासाठी जवळपास चार हजार चालक आणि वाहकांची भरती पार पडली होती. मात्र नंतर कोरोना आणि एसटीच्या संपामुळे या वाहक आणि चालकांना अंतिम नियुक्ती मिळू शकली नव्हती. शिंदे-फडणवीस सरकारने या चालक आणि वाहकांना अंतिम नियुक्ती देण्याचा निर्णय घेतला आणि त्यानुसार 17 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर 2022 दरम्यान या चालक आणि वाहकांच्या अंतिम चाचणी घेण्यात आली.
या अंतिम चाचणीमध्ये चालक आणि वाहकांचा प्रवासी वाहतूक वाहन चालवण्याचं कौशल्य तपासलं जातं. त्यासाठी 18 वेगवेगळ्या प्रकारच्या छोट्या छोट्या चाचण्या घेतल्या जातात. मात्र नागपूर जिल्ह्यातील धापेवाडा येथे या चाचणी प्रक्रियेत उत्तीर्ण करण्यासाठी प्रत्येक उमेदवाराकडून 2100 ते 3000 रुपये घेण्यात आल्याचे या व्हिडीओ मधून दिसून येत आहे. ‘एबीपी माझा’ने यासंदर्भात एसटी महामंडळातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला, तेव्हा त्यांनी लाचखोरीच्या या प्रकरणासंदर्भात आम्हाला काहीही माहित नाही अशी भूमिका घेतली.
तर एसटी महामंडळातील वरिष्ठ सुरक्षा दक्षता अधिकारी धम्मरत्न डोंगरे यांनी अशा पद्धतीचा लाचखोरीचा एक व्हिडीओ माझ्यापर्यंत ही आला असून त्याची चौकशी करण्यात आली आहे, या माहितीला दुजोरा दिला.