लोन फसवणूक प्रकरणी व फोटो मॉर्फिंग करुन नागरिकांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी देहरादून पोलिसांनी औरंगाबाद शहरातील पैठण गेट भागात एका कॉल सेंटरवर कारवाई केली. यादरम्यान शेकडो मोबाईल आणि सिम कार्ड पोलिसांनी जप्त केले असून या सेंटरच्या एका केबिनमध्ये पोलिसांना तलवारी आणि एअरगन आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नागरिकांची आर्थिक फसवणूक प्रकरणी देहरादून पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या तक्रारीचा तपास करताना देहरादून पोलीस औरंगाबादमध्ये दाखल झाले होते. कारवाईपूर्वी देहरादून पोलिसांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने पैठणगेट येथील यश एंटरप्रायजेसवर छापेमारी केली आहे. रुपी ॲपवर कर्ज घेतलेल्या ग्राहकांकडून वसुली करण्याचं काम यश एंटरप्राइजेसकडे होतं. या कॉल सेंटरमध्ये सुमारे २५०-३०० कर्मचारी कामाला होते. तीन शिफ्टमध्ये हे कॉल सेंटर चालायचे.
या ठिकाणाहून कर्ज घेतलेल्या ग्राहकांना धमक्या देणे, अश्लील भाषेचा वापर करणे. असं काम या ठिकाणी सुरू होतं. देहरादून येथील तक्रारदार ग्राहकांना याच ठिकाणाहून मोबाईलद्वारे कॉल केले जायचे तसेच त्यांना लोन भरण्यासाठी धमक्या देण्यात यायच्या. शिवाय अश्लील भाषेचा वापर केला जायचा. त्यामुळे देहरादून पोलिसांनी औरंगाबाद पोलिसांची मदत घेत या कॉल सेंटरवर छापा टाकला.