राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने २५ फेब्रुवारी रोजी करमाळा तालुक्यातील नेर्ले गावाच्या हद्दीत एका रेनॉल्ट डस्टर गाडीतून एक लाख त्रेपन हजार सहाशे किमतीचे गोवा राज्यातील दारू जप्त केली आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या करमाळाच्या पथकाचे दुय्यम निरीक्षक शंकर पाटील यांना २५ फेब्रुवारी रोजी मिळालेल्या खात्रीलायक बातमीनुसार त्यांनी जवान विकास वडमिले यांच्यासह करमाळा तालुक्यातील नेर्ले गावाच्या हद्दीत पाळत ठेवली असता त्यांना एका रेनॉल्ट डस्टर क्रमांक MH48 P 0388 या चारचाकी वाहनातून गोवा राज्य निर्मित व विक्रीस असलेले इम्पेरियल ब्ल्यू व्हिस्की १८० मिलीच्या ९६० बाटल्या वाहतूक होत असल्याचे आढळून आले.
सदर गुन्ह्यात त्यांनी वाहन चालक निलेश लालासाहेब पडवळे, वय ३१ वर्षे, राहणार उमरड, ता.करमाळा याला ताब्यात घेऊन त्याचेविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ चे कलमांतर्गत गुन्हा नोंदवला तसेच त्यास २६ फेब्रुवारी रोजी न्यायालयासमक्ष हजर केले असता मा. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी आरोपीस एका दिवसाची पोलीस कस्टडी सुनावली आहे.
या गुन्ह्यात एक लाख त्रेपन हजार सहाशे रुपये किमतीच्या गोवा दारूसह एकूण पाच लाख तेहतीस हजार सहाशे किंमतीचा मुद्देमाल राज्य उत्पादन शुल्क विभागाने हस्तगत केला आहे. या कारवाईत निरिक्षक सदानंद मस्करे, सहायक दुय्यम निरीक्षक गजानन होळकर, महावीर कोळेकर, जवान अनिल पांढरे यांनी सहकार्य केले.