लातूर शहर व लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघातील काँग्रेस पक्षाच्या नवनिर्वाचित सरपंच, ग्रामपंचायत सदस्यांच्या सत्कार सोहळयातील भोजन कक्षासाठी उभारण्यात आलेल्या मंडपाला आग लागल्यामुळे भोजनास बसलेल्या सदस्य कार्यकर्त्यांची पळापळ झाली. या घटनेमुळे काँग्रेसच्या नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांच्या नमनाच्या कार्यालयाला अग्नी तांडवाचे विघ्न निर्माण झाले.
लातूर येथील सुशीलादेवी देशमुख महाविद्यालय येथे जिल्हा काँग्रेसच्या वतीने लातूर शहर व लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत निवडून आलेल्या काँग्रेसच्या लोकनियुक्त सरपंच व सदस्यांचा सत्कार समारंभ माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख यांच्या उपस्थितीत 24 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम साडेआकराच्या सुमारास सुरू झाला. यावेळी उपस्थित सरपंच सदस्य आणि कार्यकर्ते यांच्यासाठी आयोजकाच्या वतीने भोजनाची सोय कली होती. नियोजित भोजन दुपारी तयारही झाले. त्यानंतर पदाधिकारी, कार्यकर्ते सरपंच सदस्य यांचे भोजनही सुरू झाले. परंतु भोजन कक्षासाठी उभारण्यात आलेल्या मंडपा खाली सुरू असलेल्या स्वयंपाकतील पुर्या तळण्याच्या तेलाला आग लागली ही आग विझवण्यासाठी उपस्थित कार्यकर्ते यांच्याकडून त्यावर पाण्याचा मारा करण्यात आला. त्यामुळे ही आग विझण्या एैवजी आनखीनच भडकली.आग विझविण्याचा कार्यकर्त्याकडून प्रयत्न झाला. मात्र दरम्यानच्या कालावधीमध्ये त्यालगत सुरू असलेल्या भोजन मंडपातील जेवणास बसलेल्या पदाधिकारी कार्यकर्त्यांत भितीचे वातावरण निर्माण झाल्याने पळापळ झाली. ही आग विझविण्यासाठी अग्नीशमनचे पथक पाचारण करण्यात आले होते. बर्याच प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. यात कोणतीही जिवीत हाणी झाली नाही. सरपंच, सदस्य यांचा सत्कार समारंभ महाविद्यालयाच्या सभागृहात निर्वीघ्नपणे पार पडला. मात्र या घटनेमुळे लातूर शहर, लातूर ग्रामीण मतदार संघातील नवनिर्वाचित सरपंच, सदस्य यांच्या कार्याच्या पहिल्याच उपक्रमामध्ये अग्नीचे विघ्न निर्माण झाले होते.