देशाच्या उत्तर आणि दक्षिण भागाला जोडणारा “लॉजिस्टिक हब” म्हणून अहमदनगरला नावारुपास आणण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी तब्बल ८० हजार कोटी रुपयांचे विविध रस्ते विकास प्रकल्प नितीन गडकरी यांनी हाती घेतले आहेत. “महाराष्ट्राचा धाकला जाणता राजा” अशी प्रतिमा असलेल्या गतीमान कार्यपद्धतीला अनेक ठिकाणी भूसंपादन प्रक्रिया आणि लोकांच्या कोर्टबाजीमुळे थोडा ब्रेक लागतो.नागपुरातील “गडकरी वाडा” या त्यांच्या निवासस्थान परिसरात रस्ते विकासाच्या कामात अनेक वर्ष आलेल्या तशा अडथळ्यां विषयींचे शल्य खुद्द नितीन गडकरी यांनी काही दिवसांपूर्वी जाहीरपणे व्यक्त केले होते.
या पार्श्वभूमीवर चेन्नई-सूरत या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या सोलापूर जिल्ह्यातील ९६कि.मी. रस्त्याच्या भूसंपादनाचे काम विक्रमी गतीने पूर्ण होणे कौतुकाची बाब आहे. दक्षिण भारताचे प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी ही कौतुकास्पद कामगिरी बजावली आहे.त्याचीच पावती नितीन गडकरी यांनी काल अहमदनगर मधील कार्यक्रमात सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केलेल्या कामाला शाबासकी देऊन केली.श़ंभरकर आणि त्यांच्या टीमने भूसंपादनाचे काम अवघ्या सात महिन्यात करण्याचा विक्रम नोंदविला! मिलिंद शंभरकर आणि टीमचे मनःपूर्वक अभिनंदन!