केरळच्या एर्नाकुलम येथील कन्व्हेन्शन सेंटरमध्ये आज, रविवारी जालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणाची जबाबदारी स्वीकारत एका आरोपीने आत्मसमर्पण केलेय. या कन्व्हेन्शन सेंटरमध्ये सकाळी 9.45 वाजता प्रार्थनेदरम्यान 3 साखळी बॉम्बस्फोट झाले होते.
याबाबत त्रिशूर पोलिसांनी सांगितले- कोडकारा पोलिस स्टेशनमध्ये एका व्यक्तीने आत्मसमर्पण केले आहे. कन्व्हेन्शन सेंटरमध्ये त्यानेच बॉम्ब पेरला होता, असा त्याचा दावा आहे. पोलिसांनी त्याची ओळख उघड केलेली नाही. त्याच्या बॅगेत संशयास्पद वस्तू आढळल्यानंतर कन्नूर पोलिसांनी एका व्यक्तीलाही ताब्यात घेतले. तो झारखंडचा रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. तो मंगळुरूहून एरिकोडला जात होता. सध्या आत्मसमर्पण करणाऱ्या आरोपीची कसून चौकशी करण्यात येत आहे. सोबतच संपूर्ण राज्यात अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्यातील 14 जिल्ह्यांतील पोलीस प्रमुखांना त्यांच्या भागात कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. केरळ पोलिस सोशल मीडियावरही बारीक लक्ष ठेवून आहेत. चुकीची माहिती पसरवणाऱ्या आणि जातीयवादी आणि संवेदनशील पोस्ट टाकणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितलेय. एर्नाकुलमच्या कलामासेरी येथील कन्व्हेन्शन सेंटरमध्ये झालेल्या स्फोटानंतर काही तासांतच एनआयएचे पथक घटनास्थळी पोहोचले. दिल्लीहून एनएसजीची एक विशेष टीमही संध्याकाळी दाखल झालीय. या टीममध्ये 8 एनएसजी अधिकारी आहेत. केरळ पोलीस केंद्रीय तपास यंत्रणांना मदत करण्यास तयार आहेत. वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी हजर आहेत. बॉम्ब स्फोटासाठी ‘इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोसिव्ह डिव्हाईस’ म्हणजेच आयईडीचा वापर करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. तिन्ही स्फोटके टिफिन बॉक्समध्ये लपवून ठेवली होती.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीय गुप्तचर यंत्रणांनी अलर्ट जारी केला होता. भारतातील ज्यू ठिकाणे दहशतवाद्यांचे लक्ष्य असू शकतात, असे सांगण्यात आले होते. केरळमध्ये रविवारी झालेल्या स्फोटाचा शनिवारी मलप्पुरममधील रॅलीशी काही संबंध आहे का, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. वास्तविक ही रॅली केरळमधील मलप्पुरममध्ये झाली होती. पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ निघालेल्या रॅलीला हमासचा दहशतवादी खालेद मशाएल याने संबोधित केले होते. एवढेच नाही तर जमात-ए-इस्लामीच्या युवा विंग सॉलिडॅरिटी युथ मूव्हमेंटने काढलेल्या या रॅलीत हिंदुत्वाचा बुलडोझ करून वर्णभेद झिओनिझमला उखडून टाका अशा घोषणा देण्यात आल्या. अशा घोषणांनी रॅलीत सहभागी लोकांना भडकावण्यात आले होते. दरम्यान केरळमधील बॉम्बस्फोटानंतर उत्तर प्रदेशातही हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. डीजी कायदा आणि सुव्यवस्था प्रशांत कुमार यांनी सर्व जिल्ह्यांमध्ये अलर्ट जारी केला आहे आणि यूपी एटीएसला विशेष तयार राहण्याचे निर्देश दिले आहेत.