विधानपरिषदेच्या उमेदवारीवरुन आणि देवेन भारती यांच्या नियुक्तीवरुन भाजप आणि शिंदे गटात धुसफूस असल्याची माहिती समोर येत आहे. भाजपने विधानपरिषदेसाठी परस्पर उमेदवार जाहीर केल्याचा आरोप शिंदे गटाने केला आहे. मंगळवारी 10 जानेवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतचे पडसाद उमटल्याचं समजतं.
भाजपकडून विधानपरिषदेसाठी तीन उमेदवार जाहीर
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी परस्पर उमेदवार जाहीर केल्याने शिंदे गटाच्या मंत्र्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नाराजी व्यक्त केली. येत्या 30 जानेवारी रोजी विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या पाच जागांसाठी निवडणूक होत आहे. त्यातच भाजपने मागील सोमवारी तीन उमेदवार जाहीर केले. कोकण शिक्षक मतदारसंघसाठी ज्ञानेश्वर म्हात्रे, औरंगाबाद शिक्षक मतदारासंघ किरण पाटील आणि अमरावती पदवीधर मतदारसंघासाठी माजी मंत्री रणजित पाटील यांची उमेदवारी भाजपने जाहीर केली. चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषद घेऊन तीन उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. या निवडणुकीत भाजप-शिंदे गटाची युती झाली आहे. मात्र जाहीर झालेल्या तिन्ही ठिकाणी भाजपचेच उमेदवार देण्यात आले आहेत.
परस्पर उमेदवारी घोषित करणं योग्य नाही, दादा भुसे यांची फडणवीसांकडे नाराजी
परंतु यावरुनच भाजप आणि शिंदे गटात धूसफूस सुरु आहे. भाजपने परस्पर उमेदवार जाहीर केल्याने मंत्री दादा भुसे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट सवाल केला. कोकण आणि नाशिकची जागा शिंदे गटासाठी सोडण्याचे ठरले असताना बावनकुळे यांनी परस्पर उमेदवारी घोषित करणं योग्य नसल्याचं दादा भुसे म्हणाले. एवढंच नाही तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या उमेदवारीच्या घोषणेबाबत नाराजी व्यक्त केली. यानंतर मंत्री उदय सामंत यांच्याशी चर्चा झाल्याचं सांगत देवेंद्र फडणवीस यांनी वाद मिटवण्याचा प्रयत्न केला.
देवेन भारती यांची नियुक्ती केली फडणवीसांनी, बोट माझ्याकडे दाखवलं जातंय : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
तर दुसरीकडे नुकतीच मुंबईचे विशेष पोलीस आयुक्तपदी देवेन भारती यांच्या नेमणूक झाली. देवेन भारती यांच्या विशेष पोलीस आयुक्तपदी नेमणुकीचा मुद्दाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित केला. देवेन भारती यांची नियुक्ती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आणि बोट माझ्याकडे दाखवले जात आहे. या नियुक्तीमुळे पोलीस दलात नाराजी व्यक्त होत असल्याकडे मुख्यमंत्री शिंदे यांनी सर्वांचे लक्ष वेधलं.