जैन धर्मियांचे तीर्थक्षेत्र असलेल्या सम्मेद शिखरजी पर्यटनस्थळ घोषित झाल्याने देशभरातून दिवसागणिक विरोध वाढत चालला आहे. कोल्हापुरात आज सम्मेद शिखरजी वाचवा, असा नारा देत हजारो जैन बांधवांनी दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय मोर्चा काढला. मात्र, या मोर्चाला किती लोक येतील याचा अंदाज न आल्याने पोलिसांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली. मोर्चासाठी झालेल्या अभूतपूर्व गर्दीने शाहुपूरीमधील वाहतूक अक्षरश: तुंबल्याचे दिसून आले.
जैन समाज पहिल्यांदाच एकटवणार असल्याने कोल्हापूर पोलिसांना गर्दीचा अंदाज आला नाही. दुसरीकडे, श्रद्धेचा विषय असल्याने जैन समाजातील आबालांपासून वृद्धांपर्यंत उत्त्स्फूर्तपणे गर्दी दिसून आली. यामुळे काही हजारांमध्ये मोर्चा होईल, असा अंदाज असताना भव्य स्वरुपात मोर्चा निघाला. मोर्चासाठी निवडलेला मार्गही मोठा असल्याने वाहतूक व्यवस्थेवर विपरित परिणाम झाला.
मोर्चामधील सामील लोकांची गर्दी मोठी असल्याने नागरिकांनी अन्य पर्यायी मार्गाने जाण्याचा प्रयत्न केल्याने शाहुपूरी चांगलीच वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून आले. वामन गेस्टच्या चौकात, तर रुग्णवाहिकेला मार्ग काढताना चांगलीच कसरत करावी लागली. सर्वच बाजूंनी वाहनांच्या रांगा आणि मिळेल्या त्या चिंचोळ्या मार्गातून जाणाऱ्या दुचाकी यामुळे वाहतूक तुंबल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली.
सम्मेद शिखरजी या धार्मिक स्थळाला पर्यटनस्थळाचा दिलेला दर्जा रुद्द करून धार्मिक स्थळाचा दर्जा द्यावा यासाठी कोल्हापुरात जैन बांधवानी मोठा मोर्चा काढला. हजारोंच्या संख्येने जैन बांधव रस्त्यावर उतरल्याने शहरातील मुख्य रस्ते ब्लॉक झाल्याचे दिसून आले. जैन समाजाच्या मोर्चाचे नेतृत्व स्वस्तिश्री लक्ष्मीसेन भट्टारक महास्वामी, स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी यांनी केले.